कोल्हापूर : शहरातील सार्वजनिक मंडळांचे देखावे मंगळवारपासून खुले झाले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये, विसर्जन मिरवणूक नियोजन यासंबंधीचा आढावा घेत बंदोबस्ताची आखणी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.घरगुती गणेश विसर्जनानंतर सार्वजनिक मंडळाचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होते. या गर्दीचे व विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताचे नियोजन कशा प्रकारे केले आहे, त्याचा आढावा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी पोलीस मुख्यालयात आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला.
शहरातील प्रमुख मार्गावर देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. नागरिकांना देखावे पाहण्याचा आनंदा घेता यावा, त्यांना आपण सुरक्षित आहोत याची जाणीव व्हावी, यासाठी चौका-चौकांत, गल्ली-बोळांत पोलीस बंदोबस्त ठेवावा. महिलांची छेडछाड होऊ नये, चेन स्नॅचिंग, पाकीटमारी होऊ नये, यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे, अशा सूचना डॉ. देशमुख यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत केल्या.शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीचे नियोजन कशा प्रकारे केले आहे, याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी बैठकीत दिली. सकाळी नऊ ते रात्री गर्दी संपेपर्यंत वाहतूक पोलीस रस्त्यावर राहणार आहेत. त्यांच्या मदतीला तीनशे होमगार्ड आहेत. वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे निरीक्षक गुजर यांनी सांगितले.
रविवारी (दि. २३) विसर्जन मिरवणूक आहे. तिच्या बंदोबस्ताची आखणी कशा प्रकारे केली आहे. उपद्व्यापी मंडळांची यादी, मिरवणुकीत एकही साउंड सिस्टीम येऊ नये, यासाठी काय नियोजन केले आहे, याची माहिती प्रत्येक पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाकडून घेतली.
कोण अधिकारी कोठे बंदोबस्ताला असणार, हे निश्चित करण्यात आले. नुकतीच बदली होऊन गेलेल्या जुन्या अधिकाऱ्यांना पुन्हा बंदोबस्तासाठी कोल्हापुरात बोलावले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.शहराला पोलीस छावणीचे स्वरूपगणेशोत्सव काळात चौका-चौकांत, गल्ली-बोळांत पोलीस असल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे साध्या वेशात पोलिसांची गस्त आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे नागरिकांच्या हालचाली टिपत आहेत. उभारण्यात आलेल्या मनोऱ्यांवरूनही दुर्बिणीच्या साहाय्याने पोलीस लक्ष ठेवून आहेत. संवेदनशील ठिकाणी शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.