कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून प्राध्यापक संघटनेशी चर्चा करावी. त्यासह सरकारला जागे करण्यासाठी महात्मा गांधी जयंती दिनी आज, मंगळवारी सकाळी १0 वाजता जिल्ह्यातील प्राध्यापक ‘मौनधरणे’आंदोलन करणार आहेत.
उच्च शिक्षणातील भरतीबंदी उठवावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन (एम्फुक्टो) आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाच्या सातव्या दिवशी सोमवारी टाऊन हॉल बागेत झालेल्या सभेत प्राध्यापकांनी ‘मौनधरणे’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी सकाळी १0 ते दुपारी १२ या वेळेत आंदोलन केले जाणार आहे. यावेळी सुटाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर यांनी आंदोलनामागील भूमिका, आंदोलनाचे स्वरूप, शासनाची नकारात्मक मनोवृत्ती याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख कार्यवाह प्रा. डी. एन. पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलनाचा आढावा घेतला. जिल्हाध्यक्ष अरुण पाटील, सहकार्यवाह अरुण शिंदे, शिवाजी सुतार यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित प्राध्यापकांनी मुख्यमंत्री आणि सरकारचा निषेध केला.संघटनेशी चर्चा करावीया सभेत एम्फुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी या बेमुदत कामबंद आंदोलनाचा आढावा घेतला. राज्यभरातील प्राध्यापक या आंदोलनात सहभागी झाल्याने विविध महाविद्यालयांतील अध्यापन आणि इतर उपक्रम बंद पडले आहेत. शासनाने उच्चशिक्षणाची गुणवत्ता व स्वायत्तता अबाधित राखण्यासाठी तत्काळ संघटनेशी चर्चा करावी. मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून प्राध्यापक संघटनेशी चर्चा करावी. त्यासह सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी काळ्या फिती लावून प्राध्यापक हे मौनधरणे आंदोलन करणार आहेत. त्यात शहरातील प्राध्यापक सहभागी होणार असल्याचे प्रा. जाधव यांनी सांगितले.