कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघास सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी ४० लाख ५५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही शाखांचा व्यवसाय कमी असला तरी आगामी आर्थिक वर्षात त्यांनाही नफ्यात आणण्याचा निर्धार संचालकांनी केल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या तीन वर्षांत शेतकरी सहकारी संघाचा कारभार अत्यंत पारदर्शक व काटकसरीचा सुरू असल्याने प्रत्येक वर्षी व्यवसायाबरोबर नफ्यातही वाढ होत आहे. यंदा १५९ कोटींचा व्यवसाय झाल्याने नफाही चांगला झाला. गतवर्षीपेक्षा ४० लाखांनी नफ्यात वाढ झाली. सर्वाधिक नफा खत विभागाचा असून ९९ लाख १२ हजार ७२५ रुपये आहे.
रूकडी खत कारखाना पूर्ण क्षमतेने चालत असल्याने ४६०० टन संघाने खताचे उत्पादन घेतले. संघाच्या उत्पादनांवर आजही शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असल्याने कोट्यवधीची खते विक्री करता आली. मुंबईसह कोल्हापूर जिल्ह्यात संघाचे आठ पेट्रोलपंप कार्यरत असून त्यातून २२ लाख २८ हजार ४२८ रुपयांचा निव्वळ नफा झाला.
मिरची पूड, गूळ विभाग आदींचे उत्पन्नही चांगले मिळाले आहे. जिथे व्यवसाय चांगला होऊ शकतो, त्या ठिकाणी नवीन शाखा सुरू करत असताना अकरा तोट्यांतील शाखांपैकी जास्तीत जास्त शाखा नफ्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, संचालक जी. डी. पाटील, आप्पासाहेब माने, व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ उपस्थित होते.
‘बैल छाप’ चहाशेतकरी संघाचे ‘बैल छाप’ खताने शेतकऱ्यांच्यामध्ये विश्वासाचे नाते जोपासले. त्यापाठोपाठ आता ‘बैल छाप’ चहा पावडर उत्पादन सुरू केले असून प्रत्येक शाखेवर त्याची विक्री सुरू असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
नोकरभरती अशक्यचकर्मचाऱ्यांचे ९५ लाखांचे देणे तीन टप्प्यात दिले जात असून शेवटचा ३२ लाखांचा टप्पाही आता पूर्ण होत आहे. जेवढ्या कमी कर्मचाऱ्यांमध्ये कामकाज चालविता येईल तेवढे चालवत असल्याने नवीन नोकरभरती अशक्यच असल्याचे पाटील यांनी सांगितले.
दृष्टीक्षेपात संघाची घोडदौड-आर्थिक वर्ष उलाढाल नफा
- २०१५-१६ १३२ कोटी १९ लाख ९२ हजार
- २०१६-१७ १६० कोटी १ कोटी १ लाख
- २०१७-१८ १५९ कोटी १ कोटी ४० लाख