कोल्हापूर : ‘कुलगुरूंच्या पक्षपाती कृतीचा निषेध असो’, ‘प्रश्न, ठराव नाकारणाऱ्या कुलगुरुंचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) अधिसभा सदस्यांनी मंगळवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा निषेध केला. या सदस्यांनी धरणे आंदोलन करुन विद्यापीठाच्या अधिसभेवर बहिष्कार घातला.‘सुटा’च्या अधिसभा सदस्यांनी सात ठराव आणि १८ प्रश्न हे अधिसभेसाठी विहित मुदतीमध्ये आणि विद्यापीठाच्या मार्गदर्शक निकषांनुसार सादर केले होते. यातील केवळ चार प्रश्न कुलगुरु डॉ. शिंदे यांनी स्वीकारले. कुलगुरुंनी जाणीवपूर्वक, पक्षपाती पद्धतीने आमचे प्रश्न वगळले असल्याचे सांगत सुटाच्या अधिसभा सदस्यांनी कुलगुरुंचा मंगळवारी निषेध केला.
या सदस्यांनी अधिसभेवर बहिष्कार घातला. त्यांनी अधिसभा सुरू असताना सभागृहाबाहेर ‘घटनाबाह्य सताकेंद्र म्हणून नेमलेल्या शैक्षणिक सल्लागारांची नियुक्ती रद्द करा’, ‘सदस्यांच्या लोकशाही हक्कांवर गदा आणणाऱ्यां कुलगुरुंचा निषेध असो’, अशी जोरदार घोषणाबाजीने कुलगुरुंचा निषेध केला. यानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर धरणे आंदोलन केले.
दुपारी अर्थसंकल्पाबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर कुलगुरु डॉ. शिंदे यांनी सुटाच्या सदस्यांना सभागृहात चर्चेसाठी निमंत्रित केले. मात्र, या सदस्यांनी त्याला नकार देत आंदोलन कायम ठेवले. या आंदोलनात सुटाचे अधिसभा सदस्य प्रा. ए. बी. पाटील, एन. के. खंदारे, एम. डी. गुजर, आर. आर. थोरात, अरुण पाटील, इला जोगी, अलका निकम, सुटाचे जिल्हा समन्वयक सुधाकर मानकर, आदी सहभागी झाले.
बैठकीत अनेक मुद्यांवर मौनया आंदोलनापूर्वी सुटाच्या सदस्यांना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी चर्चेसाठी बोलविले. सकाळी साडेदहा वाजता त्यांच्यातील चर्चा सुरू झाली. यात सुटा सदस्यांनी आमचे ठराव आणि प्रश्न का? नाकारले अशी विचारणा केली असता, यावर कुलगुरुंनी मौन बाळगल्याचे सुटाचे जिल्हा समन्वयक सुधाकर मानकर यांनी सांगितले.
ते म्हणाले, नामनिर्देशनातील चुका या सदस्यांनी दाखवून दिल्या. त्यावर कुलगुरुंनी हे गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. साधारणत: पाऊण तास चाललेल्या बैठकीत आम्ही मांडलेल्या मुद्यांबाबत त्यांना काहीच ठोस सांगता आले नाही. त्यामुळे आमच्या सदस्यांनी अधिसभेवरील बहिष्कार कायम ठेवून धरणे आंदोलन केले. ठराव नाकारुन कुलगुरुंनी विद्यापीठाच्या परिनियमांची पायमल्ली केली आहे.
.