कोल्हापूर : शहर हद्दीत काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार असल्याबाबतचे दाखले देण्यात यावेत या मागणीसाठी बुधवारी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
बुधवारी महासभा असल्याने कृती समितीसमोर ठिय्या केल्यामुळे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या दरवाजातून मुख्य कार्यालयात जावे लागले. नंतर कृती समितीने आयुक्त अभिजित चौधरी यांना निवेदन दिले.बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी शहरी भागातील कामगारांना कोल्हापूर महानगर पालिकेकडून कामगार असल्याचा दाखल देण्यात येत होता. परंतु गेले वर्षभर मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दाखले देणे बंद आहे. काही विभागीय कार्यालयात दाखलेच मिळत नाही.
काही विभागीय कार्यालयात जाचक व अशक्य अटी घालून दाखे देण्याची प्रक्रिया सुरु ठेवली होती. काही विभागीय कार्यालयाना बांधकाम कामगारांना कशा पध्दतीने दाखले देतात हेच माहित नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांची मोठी गैरसोय होत आहे.
म्हणूनच जिल्हा परिषद प्रशासन ज्या पध्दतीने सर्व ग्रामपंचायतींना संघटनेच्या हमीपत्रावर दाखले देण्याचे आदेश दिले आहेत त्याच पध्दतीने महानगरपालिका प्रशासनानेही दाखले द्यावेत, आणि बांधकाम कामगारांना दाखले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शहर उपअभियंत्यावर कारवाई करावी या मागणीसाठी बुधवारी महापालिकेसमोर कृती समितीने ठिय्या आंदोलन केले.सुमारे तासभर आंदोलन झाल्यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिजित चौधरी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. शिष्टमंडळात अध्यक्ष गुणवंत नागटीळे, उपाध्यक्ष संजय सुतार, के.पी. पाटील, संतोष गायकवाड, अभिजित केकरे, जोतीराम मोरे, परशुराम लाखे आदींचा समावेश होता.