कोल्हापूर : येथील वंदे मातरम् यूथ आॅर्गनायझेशनमार्फत सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सोई-सुविधांबाबत मागण्यांचे निवेदन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आले. यामध्ये रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीनची मागणी प्राधान्याने करण्यात आली.दोन वर्षांपूर्वी वंदे मातरम् यूथ आॅर्गनायझेशनमार्फत सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सुविधा, इमारतीची डागडुजी करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. परिणामी, प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या; पण काही मशिनरी जुन्या व कालबाह्य झाल्या आहेत. तसेच त्या मशिनरीची दुरुस्तीही होणे अशक्य आहे.त्याचप्रमाणे येथील एक्स-रे मशीनही कालबाह्य झाल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे; त्यामुळे देवस्थान समितीने डिजिटल एक्स-रे मशीन व त्यासाठी लागणारी इतर सामग्री व डायग्नोस्टिक सेंटरकडे बाहेरील बाजूस रुग्ण व नातेवाईकांसाठी शेड बैठक व्यवस्था करावी.
बालविभागाची डागडुजी करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात आली. या निधीबाबत देवस्थान समितीच्या इतर सदस्यांशी चर्चा करून ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन अध्यक्ष महेश जाधव यांनी शिष्टमंडळास दिले.या शिष्टमंडळात अवधूत भाट्ये, बंडा साळोखे, महेश उरसाल, राजेंद्र सूर्यवंशी, बिपीन साळोखे, प्रकाश सरनाईक, प्रसाद जाधव, विशाल भोंगाळे, सुनील सामंत, सूरज इंगवले, अनिल कोडोलीकर, गणेश लाड, विवेक वोरा, प्रसाद मोहिते, आदी उपस्थित होते.