कोल्हापूर : महाराष्ट्रातील ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना महिना सरसकट ५ हजार रुपये निवृत्तिवेतन द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी संघाच्यावतीने दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांनी उपोषणस्थळी भेट देऊन या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक मागण्या सन १९९९ पासून प्रलंबित आहेत. सन १९९९ मध्ये ज्येष्ठ नागरिक धोरण शासनाने जाहीर केले. या धोरणाची सन २००४, २०११ आणि दि. ३० सप्टेंबर २०१५ रोजी पुनर्रचना करण्यात आली; परंतु या धोरणाची अंमलबजावणी मात्र शासनाने केलेली नाही तसेच यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली नाही.
या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. ६० वर्षांवरील नागरिकास ज्येष्ठ नागरिक समजावे, दि. ३० सप्टेंबर २०१५ रोजी जाहीर केलेल्या धोरणास सत्वर आर्थिक तरतूदीसह मंजुरी द्यावी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी, संजय गांधी योजनेतील निवृत्तिवेतनात वाढ करावी, विनामूल्य आरोग्य विमा योजना लागू करावी, राज्यामध्ये १ कोटी २५ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. या सर्वांना सेवा, संधी, सुश्र्रुषा, सुरक्षितता, सवलत याबाबत अभ्यास करून तातडीने निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आयोग आणि मंत्री नेमावेत अशा विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.यावेळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष डॉ. मानसिंग जगताप, जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजी हिलगे, शहर अध्यक्ष जयंत लाटकर, सचिव आण्णासो दानोळे, श्रीकृष्ण वाघ, श्रीकांत आडिवरेकर, डॉ. दशरथ चौगुले, सी. के. नलवडे, य. ना. कदम यांच्यासह विविध ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.