कोल्हापूर : शासनाने दिवाळीनिमित्त जाहीर केलेली साखर, हरभरा, उडीदडाळ अद्याप रेशन दुकानदारांना मिळालेली नाही. ती लवकर उपलब्ध करून द्यावी, यासह विविध मागण्या रेशन बचाव समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकारी अमित माळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या.निवेदनात म्हटले आहे की, साखर, हरभरा, उडीदडाळ अद्याप गोदामात उपलब्ध नाही, असे असताना दुकानदारांकडून पुरवठा विभागाने पैसे भरून घेतले आहेत; त्यामुळे या वस्तू त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असल्याने ‘ई-पॉस’ मशीनचा डाटा १ तारखेस यावा म्हणजे १ तारखेपासूनच विक्री चालू होईल.
गेल्या महिन्यात डाटा ५ तारखेस उपलब्ध झाल्याने दुकानदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आधार सिडिंगची मुदत वाढविण्यात येऊन, ती तीन महिने करावी. फॉर्मचा डाटा भरताना त्याची फी आकारणी दुकानदारांवर न लादता, ती सरकारने भरावी.
‘ई-पॉस’ मशीनबाबत स्वतंत्र आॅपरेटर, तांत्रिक सल्लागार नियुक्त व्हावेत, ‘डीबीटी’ सिस्टीम रद्द करून याबाबत २१ आॅगस्ट व २९ सप्टेंबरची शासकीय परिपत्रके रद्द करावीत. दुकानदारांना धान्य वितरणाचे कमिशन वाढवावे किंवा त्यांना वेतन निश्चित करावे.शिष्टमंडळात अध्यक्ष चंद्रकांत यादव, रवींद्र मोरे, अरुणा सूर्यवंशी, बाबासो पाटील, विजय पाटील, किरण संकपाळ, सुप्रिया शिराळे, नयन पाटील, शीला जाधव, आदींचा समावेश होता.