कोल्हापूर : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने जिल्ह्यासाठी ११३ कोटींची तरतूद केली असून, या निधीचा योग्य विनियोग करून रचनात्मक आणि उठावदार काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, हा निधी सर्वांना विश्वासात घेऊन योग्य त्या बाबींवर खर्च करण्याचे नियोजन केले जाईल. या निधीतून दलित वस्त्यांमधील रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी या गोष्टींना प्राधान्य दिले जाईल. या निधीतून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी सुमारे ४४ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल.
यामध्ये ग्रामीण भागातील वस्त्यांसाठी ३० कोटी, तर नागरी भागातील वस्त्यांसाठी १४ कोटी उपलब्ध करून दिले जातील. या निधीतून सामान्य माणसाला सहायभूत होईल, असे रचनात्मक काम केले जाईल.