कोल्हापूर : महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढविणे, नागरिकांचा महापालिकेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन आदी प्रचार व प्रसारासाठी जनजागृती दूचाकी रॅली मंगळवारी दसरा चौकातून काढण्यात आली.
महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते ध्वज दाखवून रॅलीचे उदघाटन झाले. यावेळी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, शिक्षण समिती सभापती वनिता देठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्राथमिक शिक्षण समितीच्या ५९ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये ९६५१ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. सन २०१८-१९ मध्ये गुढीपाडव्या दिवशी १०२१ विद्यार्थ्यांची नोंदणी महापालिकेच्या शाळेत झाली आहे.
महापालिका शाळेतील वैशिष्ट्यांचा प्रचार व प्रसार होणे, शाळांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा कामी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासमवेत दुचाकीवरुन या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जवाहरनगर, राजोपाद्येनगर, फुलेवाडी, बावडा व टेंबलाईवाडी या पाच विभागातून शाळा परिसरात रॅली काढणेत आली. यानंतर या विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी दुचाकीवरुन मुख्य रॅलीसाठी दसरा चौक येथे एकत्रित आले होते.