कोल्हापूर : झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा फायदा करून देतो, असे आमिष दाखवून महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा या राज्यांतील गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या चौघा भामट्यांच्या विरोधात पुणे येथील दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या चौघांचा पुणे पोलीस ताबा घेणार असल्याचे समजते.झीप क्वॉईनच्या माध्यमातून तीन राज्यांतील शेकडो लोकांना कोट्यवधीचा गंडा घालणाºया संशयित बालाजी गणगे, राजेंद्र नेर्लेकर, संजय कुंभार या तिघांनी पुण्यात चांदीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ४० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच काही गुंतवणूकदारांना लाभांशाचे आमिष दाखवून पैसे उकळले आहेत.
कर्नाटकातही त्यांनी अनेकांना गंडा घातला आहे. सध्या नेर्लेकर बंधूसह कुंभार कळंबा मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपताच पुणे पोलीस ताबा घेणार आहेत.
या भामट्यांनी जयसिंगपूर येथील एका सेवानिवृत्त शिक्षिकेला सुमारे सतरा लाख रुपयांना गंडा घातला आहे. महिलेच्या घरी याची माहिती नाही. फसवणूक झाल्यापासून महिलेची मानसिक स्थिती ढासळली आहे. संशयित गणगे हा दि. १५ मे पर्यंत पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडून कसून चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी सांगितले.