कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. श्रीरंग रामचंद्र यादव यांना इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन यांच्या वतीने ४ जानेवारी २०१९ रोजी मानाचा डॉ. व्ही. पुरी स्मृती पुरस्कार तसेच ६ जानेवारी २०१९ रोजी वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेद्वारे डॉ. वा. द. वर्तक वनमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ. एस. आर. यादव हे २०१६ साली शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून निवृत झाले. त्यानंतरही त्यांनी त्यांचे संशोधनाचे काम सुरूच ठेवले. यासाठी त्यांना युजीसीने शिष्यवृत्ती दिली असून ते सध्या बी. एस. आर. फॅकल्टी फेलो म्हणून शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागात कार्यरत आहेत.
त्यांचे आजपर्यंत २६० पेक्षा अधिक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या नावावर ९ संशोधनात्मक ग्रंथ असून प्रामुख्याने वनस्पती वर्गीकरण आणि वनस्पतीची गुणसूत्र यावर त्यांनी विशेष संशोधन केले आहे. भारतीय उपखंडातील गवतवर्गीय वनस्पतींचे तज्ञ् म्हणून त्यांची जगभर ख्याती आहे. याबरोबरच पश्चिम घाटातील दुर्मिळ, प्रदेशनिष्ठ आणि लुप्त होत चाललेल्या वनस्पतींच्या संवर्धनामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.अध्यापनाच्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी २५ पेक्षा अधिक पीएच.डी. व ११ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एम.फील. साठी सफलता पूर्वक मार्गदर्शन केले आहे. देशविदेशांत विविध विद्यापीठे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशने, कार्यशाळा, चर्चासत्रांमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते सहभागी झाले आहेत. त्यांनी आजपर्यंत सपुष्प आवृतबीजी वनस्पतींच्या ६६ नवीन प्रजाती शोधल्या आहेत.
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि वनस्पतीशास्त्रातील कार्यकर्तृत्वामुळे शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे उद्यान हे पश्चिम भारतातील पहिले अग्रणी वनस्पती उद्यान म्हणून नावारूपाला आले. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ वनस्पतींच्या काही जातींना भारतातील इतर वनस्पती संशोधकांनी (उदा. युलालीया श्रीरंगाय, व्हिग्ना यादवी, कन्स्कोरा श्रीरंगियाना, म्युक्युना यादवी इ.) त्यांच नाव देऊन गौरव केला आहे.देशभरातील नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्स, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी, महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ सायन्स या संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त असणारे शिवाजी विद्यापीठातील ते एकमेव प्राध्यापक आहेत. १९९९ साली प्रा. एस. आर. यादव यांना शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक हा सन्मान प्राप्त झाला.
याबरोबरच शिवरामां सुवर्ण पदक (२००३) आणि पंचानन महेश्वरी (२०१३) पदकाचे ते मानकरी आहेत. पर्यावरण दिनाचे औचीत्य साधून ४ जून, २०१८ रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्यामार्फत वनस्पती वर्गीकरण शास्त्रातील कामगिरीबद्दल दिला जाणारा ई. के. जानकी अमल हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार डॉ. श्रीरंग रामचंद्र यादव यांना केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळविणारे डॉ. एस. आर. यादव हे महाराष्ट्रातील एकमेव शास्त्रज्ञ आहेत.