कोल्हापूर : अटलबिहारी वाजपेयी यांनी सन २००२ मध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. सन २००४ मध्ये या समितीने अहवाल दिला. तत्कालिन कृषीमंत्री असलेल्या शरद पवारांनी हा अहवाल स्वीकारणे शक्य नसल्याचे २०१४ पर्यंतच्या प्रत्येक अधिवेशनात सांगितले. मात्र, सत्ता जाताच त्यांना हा आयोग जवळचा वाटू लागला. त्यांनी सत्तेवर असताना हा अहवाल का डावलला याचे आधी उत्तर द्यावे, असे आवाहन भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले आहे.कोल्हापूर येथे डॉ. हेडगेवार व्याख्यानमालेसाठी आलेल्या भंडारी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. कोल्हापूरमध्ये आलोय म्हटल्यावर स्वामीनाथन अहवालावर सविस्तर बोलले पाहिजे, असे सांगून त्यांनी याबाबतची मांडणी केली. ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांना उत्पन्नखर्चाच्या दीडपट हमीभाव देता येणार नाही,’ अशी पवार यांनी स्पष्टपणे दिलेली उत्तरे संसदेत नोंदली गेली आहेत.
मात्र, सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तेच उलटा प्रश्न विचारत आहेत. मोदी सरकारने या अहवालाच्या बहुतांशी शिफारशी मान्य केल्या असून दीडपट हमीभावाची अंमलबजावणी येत्या खरिपापासून होईल.मित्रपक्षाच्या सोडचिठ्ठीबद्दल विचारल्यानंतर भंडारी म्हणाले, जनसंघ असल्यापासून आघाड्यांचे राजकारण सुरू केले गेले. अटलबिहारी वाजपेयी यांनी २६ पक्षांचे सरकार चालवले; परंतु आता ज्यांना आपल्या राजकारणासाठी म्हणून आमची संगत सोडायची आहे. त्यांना सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत. कर्नाटकमध्ये भाजप सत्तेवर येईल, असा पूर्व अंदाज व्यक्त होऊ लागला आहे. या निकालाचा परिणाम येत्या लोकसभेवर अपरिहार्य आहे.महाराष्ट्राच्या सकल उत्पन्नाच्या २२.५0 टक्के कर्ज घेणे शक्य आहे. मात्र, सध्या सरकारने १६ टक्के कर्ज घेतले आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली नाही. या कर्जरकमेतून गेल्या साडेतीन वर्षांत मूलभूत सोयी आणि सुविधांचे मोठे काम झाल्याचा दावा यावेळी भंडारी यांनी केला.
पत्रकार परिषदेला भाजपचे कोल्हापूर महानगर अध्यक्ष संदीप देसाई, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, सुभाष रामुगडे, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, शंतनु मोहिते, नगरसेवक अजित ठाणेकर उपस्थित होते.
महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्नभाजपचा मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेस आणि अनेक डाव्या संघटना अस्वस्थ आहेत. त्यामुळे विविध संघटनांना पुढे करून, असलेले नसलेले प्रश्न उपस्थित करून गेली साडेतीन वर्षे महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी भंडारी यांनी केला.
राज ठाकरेंची घोषणा हा मोठा विनोदराज ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने रोजगारमुक्त केले आहे. ज्यांच्या निशाणीवर महाराष्ट्रात कुणीही निवडून येऊ शकत नाही, त्यांचा एकही आमदार नाही, मुंबईत नगरसेवकही नाहीत त्यांनी मोदीमुक्त भारताची घोषणा करणे यासारखा दुसरा मोठा विनोद नाही.
६ एप्रिलला मुंबईत महामेळावाभाजपच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील ‘बीकेसी’मध्ये सकाळी ११.३० वाजता महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामपंचायत सदस्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत ३ लाख जण या मेळाव्यास उपस्थित राहणार असून त्याचे नियोजन सुरू असल्याचे भंडारी यांनी यावेळी सांगितले.