प्रकाश पाटील ल्ल कोपार्डेकोल्हापूर-राधानगरी मार्गाची वाहतूक गेली पाच वर्षे रंकाळा तलाव पूर्वेकडील रस्त्याचे काम सुरू असल्याने, रिंगरोडमार्गे वळविण्यात आली होती. यामुळे एस. टी. महामंडळाने रिंगरोडमार्गे अर्धा स्टेज वाढत असल्याने तिकिटात ३ रुपये वाढ केली होती. मात्र, रिंगरोड मार्गे होणारी वाहतूक आता रस्ता दुरुस्तीनंतर रंकाळा जुना वाशी नाका-क्रशर चौक मार्गे पूर्ववत सुरू केली असली तरी तिकीट दर मात्र कमी केले नसल्याने, दर दिवशी प्रवाशांवर १५ हजार रुपयांचा अधिकचा भार पडत आहे.कोल्हापूर-राधानगरी दरम्यान दिवसभरात एस. टी.च्या १00 फेऱ्या होतात. तसेच राधानगरीच्या पुढे जाणाऱ्या गाड्यांची संख्याही २२ ते २५ च्या दरम्यान आहे. रंकाळा पूर्वेकडील बाजूचा रस्ता खराब झाल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक गेल्या पाच वर्षांपासून रंकाळा डेपो, रिंग रोडमार्गे वळवून साने गुरुजी वसाहतीतून राधानगरी मार्गावर धावत होत्या. गेली चार ते पाच वर्षे रंकाळ्याच्या पूर्वेकडील रस्त्याच्या मजबुतीकरण व अस्तरीकरणाचे काम रखडल्याने ही वाहतूक रिंगरोड मार्गेच सुरू होती.मात्र, गेल्या एक दीड वर्षापासून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एस. टी. चालकांनी रंकाळा, रिंगरोड मार्गे जाण्याऐवजी रंकाळा, राज कपूर पुतळा, जुना वाशी नाका, क्रशर चौक मार्गे गाड्या सुरू केल्या आहेत. हा मार्ग बहुतांश अवजड वाहनांनाही खुला झाल्याने पूर्ववत एस. टी. वाहतूकही सुरू आहे, पण रिंगरोड मार्गे वळविलेल्या वाहतुकीवेळी अंतर वाढल्याने एस. टी. प्रशासनाने अर्ध्या स्टेजची आकारणी वाढल्याने प्रति प्रवासी तीन रुपये केलेली वाढ आता क्रशर चौकमार्गे वाहतूक सुरू असताना कमी करण्यात आलेली नाही.या मार्गावरून रंकाळा ते राधानगरी अशा १00 फेऱ्या आहेत. त्याशिवाय राधानगरीच्या पुढे कोकणात जाणाऱ्या २0 ते २१ व कोकणातून राधानगरीमार्गे कोल्हापूरच्या जाणाऱ्या १५ ते १६ एस. टी. बसेस आहेत. प्रत्येक गाडीमध्ये सरासरी ४० प्रवासी प्रवास करतात, असे गृहीत धरल्यास किमान ४ हजार प्रवासी रंकाळा-राधानगरी दरम्यान प्रवास करतात, तर त्यापुढे जाणाऱ्या गाड्यांचा विचार केल्यास एक हजार ते १५०० प्रवासी प्रवास करत आहेत. प्रत्येक प्रवाशाला आजही रंकाळा रिंग रोडमार्गे जाणाऱ्या मार्गावरील स्टेजप्रमाणे आकारणी होत आहे. ही आकारणी प्रति प्रवासी तीन रुपये जादा होत असून, किमान १३ ते १५ हजार रुपये प्रवाशांच्या खिशातून एस. टी. महामंडळ जादा काढून घेत असल्याने प्रवासीवर्गातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.नवा मार्गच अनधिकृतया मार्गावरून एस. टी.चे चालक एसटी घेऊन जात असले तरी महानगरपालिकेने तीन चारवेळा विनंती पत्र पाठवूनही एस. टी. वाहतुकीस परवानगी दिलेली नाही. पण हा मार्ग पूर्ण झाल्याने एस. टी. चालक रंकाळा पूर्वेकडील बाजूने क्रशर चौक मार्गे गाड्या घेऊन जात आहेत, पण हे अनधिकृत असून जोपर्यंत महानगरपालिका या मार्गावरून वाहतुकीस अधिकृत परवानगी देत नाही तोपर्यंत प्रशासन ही दरवाढ कमी करू शकत नाही, असे आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दुय्यम अधिकाऱ्याने माहिती दिली.दिवसांतून १00 फेऱ्यांमधून ४ हजार प्रवासी प्रवास करतातप्रवासी संख्या पाहता दर दिवशी १३ ते १५ हजार रुपये एस.टी.कडून वसूलखिशातून जादा पैसे काढून घेत असल्याने प्रवासी वर्गातून संताप
कोल्हापूर-राधानगरी प्रवाशांना भुर्दंड
By admin | Published: January 09, 2017 12:21 AM