कोल्हापूर : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस तथा कोल्हापूर रेल्वेस्थानकाला देशातील मॉडेल स्टेशन बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी येथे केले. कोल्हापूर रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी १ कोटी ५५ लाखांच्या कामांना सोमवारी सुरुवात झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ ची उंची वाढविणे, प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर छत उभारणे, सरकता जिना उभारणे, राजारामपुरीतून रेल्वेस्थानकात येणाऱ्या प्रवाशांसाठी पादचारी उड्डाणपूल उभारणे, राजारामपुरीकडील बाजूला तिकीट आरक्षण खिडकी सुरू करणे, रेल्वेस्थानक परिसरात सीसीटीव्ही बसविणे अशा विविध कामांचा समावेश आहे.विकासकामांचे उद्घाटन खासदार महाडिक यांच्या हस्ते झाले. खासदार महाडिक म्हणाले, रेल्वेस्थानकाची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या स्थानकाच्या दुरुस्ती व सुधारणांसाठी निधी मिळत नव्हता. यासाठी आपण पाठपुरावा करून विकासकामांसाठी निधी मिळविला. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर रेल्वेचे प्रश्न प्रलंबित होते. प्लॅटफॉर्म आणि रेल्वे डब्याचा जिना यातील अंतरामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली होती. तसेच रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होईल.पुणे-मिरज रेल्वे मार्गांच्या दुहेरीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. कोल्हापूर-मिरज दुहेरीकरणासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूर-कोकण रेल्वेला जोडण्याच्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कोल्हापूर-नागपूर ही आठवड्यातून दोन वेळा धावणारी गाडी आता १ नोव्हेंबरपासून आठवड्यातून सहा वेळा धावेल. त्याशिवाय कोल्हापूर-मुंबई नवीन रेल्वेसाठी पाठपुरावा चालू आहे.यावेळी रेल्वेचे विभागीय अभियंता गुणशेखरन, स्टेशन प्रबंधक सुग्रीव मीना, रेल्वे अधिकारी शंकर गुणे, पुणे क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, महाराष्ट्र रेल्वे-रोड पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णराव सोळंकी, रेल्वे प्रवासी संघटनेचे मोहन शेटे, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगरसेवक रशीद बारगीर, समीर शेठ, जयेश ओसवाल, अशोक कांबळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
कोल्हापूर रेल्वेस्थानक मॉडेल स्टेशन करणार
By admin | Published: June 09, 2015 1:02 AM