कोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वेस्थानक) येथील नव्या प्लॅटफॉर्मचे काम सुरू झाले असून ते दि. ३१ मार्चपूर्वी पूर्ण होणार आहे. स्थानकावर २४ डब्यांची रेल्वे लावण्यासाठी हा नवा चौथा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरणार आहे.या रेल्वेस्थानकाची क्षमता वाढविण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म बांधणीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरकर आणि रेल्वे प्रवाशांकडून सुरू होती. त्यानुसार सप्टेंबर २०१८ मध्ये पुणे येथे रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा, विभागीय महाव्यवस्थापक मिलिंद देऊसकर, कृष्णात पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे प्रशासनाची बैठक झाली. त्यामध्ये सध्याच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी. नवीन प्लॅटफॉर्मची बांधणी आदींबाबत चर्चा झाली.
या मागण्यांची गरज आणि उपयुक्तता लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर या दोन्ही मागण्या मान्य झाल्या आहे. रेल्वे प्रशासनाने त्यासाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निर्णयानुसार रेल्वे स्थानकावर दि. १ डिसेंबरपासून नव्या प्लॅटफॉर्मचे काम सुरू झाले आहे.
रेल्वे प्रशासनाच्या जागेतील अतिक्रमण काढल्यानंतर रिकाम्या झालेल्या परीख पूल ते मध्यवर्ती बसस्थानक या मार्गाच्या बाजूच्या जेम्स स्टोन कॉम्प्लेक्समोर हा नवा प्लॅटफॉर्म करण्यात येत आहे. दि. ३१ मार्चपूर्वी हा प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून काम सुरू आहे. सध्या रेल्वेस्थानकावर तीन प्लॅटफॉर्म कार्यान्वित आहेत. बारा डब्यांची लांबी असलेल्या प्लॅटफॉर्मची लांबी आणखी वाढविली जाणार आहे.
चौथा प्लॅटफॉर्म दृष्टिक्षेपातया नव्या चौथ्या प्लॅटफॉर्मची लांबी ५७५ मीटर, तर रूंदी सात मीटर आहे. नेहमीच्या प्लॅटफॉर्मपेक्षा त्याची उंची जादा असणार आहे. सध्या तीनच प्लॅटफॉर्म असल्याने जादा रेल्वे ही वळीवडे अथवा रूकडी याठिकाणी लावावी लागत आहे. या नव्या प्लॅटफॉर्ममुळे संबंधित अडचण दूर होणार आहे. याठिकाणी २४ बोगींची रेल्वे लावता येणार असून नव्या रेल्वे सुरू होण्यासाठी मदत होणार असल्याचे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ यांनी सांगितले.
अकरा जानेवारीनंतर ‘सरकता जिना’शाहूपुरी भाजी मंडईच्या दिशेला रेल्वे प्रशासनातर्फे ‘सरकता जिना’ (एक्सलेटर) ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याची रेल्वेच्या अभियंत्यांकडून चाचणी झाल्यानंतर प्रवाशांसाठी तो खुला केला जाणार आहे.साधारणत: दि. ११ जानेवारीनंतर सरकता जिन्याची सुविधा उपलब्ध होईल.