कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज सकाळी विश्रांती घेतली असून पाणी पातळी ५५.४ इंचावर आली आहे. दरम्यान, पुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जोमाने मदत कार्य सुरू झाले असून एनडीआरएफच्या (NDRF) आणखी चार तुकड्या कोल्हापुरात हवाई मार्गाने आज सायंकाळी दाखल होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज सकाळी ट्विटरवरून ही माहिती दिली.
कोल्हापुरात यापूर्वीच तीन तुकड्या दाखल झाल्या आहेत. आज दुपारी अजून ४ तुकड्या हवाईमार्गे कोल्हापूर विमानतळावर दाखल होत आहेत. यात २५ जवान आणि तीन बोटींचा समावेश आहे. गेले चार दिवस झालेल्या पावसाने कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच विक्रमी महापुराची नोंद झाली. २०१९ मध्ये झालेल्या महापुरावेळी कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी ही ५५.६ इंचावर होती. या वर्षी नदीची पाणीपातळी ५६ फुटावर गेली.यामुळे कोल्हापूरकर महापुराच्या तडाख्यात सापडले.
आता काल मध्यरात्रीपासून कोल्हापुरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम आहे. मध्यरात्री पंचगंगा नदीचे पाणी पातळीही ५६ फुटांवर होती. ती सहा वाजेपर्यंत स्थिर राहिली. आज सकाळपासून तीन इंचाने पाणी पातळी उतरली असून कोल्हापूरकरांना सूर्य दर्शन झाले आहे. दरम्यान, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अजूनही पाणी असल्याने दोन्ही बाजूंकडील वाहतुक ठप्प आहे.