- श्रीकांत ऱ्हायकर लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : गेल्या आठवड्यापासून राज्यातील काही मोजकेच जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. येथील तुळशी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गुरुवारी राज्यातील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे . २४तासात या पाणलोट क्षेत्रात ८९५ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे . राज्यातील बहुदा हा सर्वाधिक पाऊस असल्याचे सांगितले जाते . महाबळेश्वर येथील जोर येथे याअगोदर ६६० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला होता . तो राज्यातील आज अखेरचा सर्वाधिक पाऊस होता . (Record break rain fall in Dhamod reagion of Radhanagari.)
धामोड ( ता. राधानगरी ) येथील तुळशी नदीच्या चांगले पाणलोटक्षेत्र मध्ये २४तासात नोंदवल्या गेलेल्या ८९५ मिलिमीटर पावसाने इथले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे . या पावसाने माळवाडी,पिलावरेवाडी, गोतेवाडी, कुपलेवाडी, शिरगांव या ठिकाणी दरड कोसळून व भूस्खलन होऊन मोठे नुकसान झाले आहे . काही ठिकाणी जीवित हानी सुद्धा झाली आहे . या पावसाचा अधिक फटका हा नदी-नाले,ओढ्याशेजारी असणाऱ्या शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे . नदी काठाची शेती पाण्याच्या प्रवाहाने अक्षरशः धुवून नेली आहे . नदीकाठावर चे विद्युत पंप विहिरी गायब झाल्या आहेत .
माळवाडी केळोशी दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन डोंगराचा बहुतांशी भाग रस्त्यावर आल्याने रस्ताच गायब झाला आहे . येथील नंदकुमार नाईक या तरुणाची अर्धा एकर शेती ऊस व भात पिकासह पाण्याने पूर्णतः धुवुन नेली आहे . परिसरात झालेला हा पाऊस म्हणजे आम्ही या आधी कधीही न पाहिलेला पाऊस असल्याचे येथील वयोवृद्ध मंडळींनी सांगितले . या अगोदर सन २०१९रोजी या परिसरात ३३५ मिलिमीटर इतका पाऊस नोंदला गेला होता . पण गुरुवारी बारा तासात ४०० मिलिमीटर तर गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळी ६पर्यंतच्या बारा तासात ४९५ मिलिमीटर असा एकूण ८९५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे .