कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत नसल्याची बाब राज्य शासनाने गांभीर्याने घेतली असून, जिल्ह्यात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशा स्पष्ट सूचना सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या असताना मंगळवारी दुपारपर्यंत पुन्हा एकदा शहरातील गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पहायला मिळाले. दुपारी तीननंतर मात्र पावसानेच गर्दीवर नियंत्रण मिळविले. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोल्हापूर शहर अत्यावश्यक सेवेत असल्याचा आभास या गर्दीवरून निर्माण झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण लॉकडाऊननंतर जिल्हा प्रशासनाने निर्बंध काहीसे शिथिल केले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी अकराऐवजी दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. त्याचा गैरफायदा घेत लोकांची गर्दी दुपारी चारपर्यंत कायम राहत आहे. चार वाजून गेल्यानंतरही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात असेच गर्दीचे चित्र कायम आहे. सर्व शासकीय कार्यालये, महानगरपालिका, खासगी अस्थापना नियमित सुरू असल्याचे वर्दळ वाढली आहे.
सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोप यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. जिल्ह्यासह शहरातून सतत वाढत असलेली गर्दी, नागरिकांची बेफिकिरी हीच कारणे असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी निर्बंध कडक करावेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या. या सूचना देऊन केवळ चोवीस तास होण्याच्या आतच शहरात पुन्हा गर्दी झाली. भाजी मंडई, दुकानांत नागरिकांची होणाऱ्या या गर्दीवर पोलिसांसह महानगरपालिका पथकांचेही नियंत्रण नव्हते. काही रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. महापालिकेचे कर्मचारी वाहनातून, रिक्षातून लाऊड स्पिकरद्वारे केवळ आवाहन करताना दिसत होते.
भाजी मंडई, धान्य बाजार, पावसाळी साहित्य खरेदीकरिता नागरिक रस्त्यावर उतरले होते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत होते. अत्यावश्यक सेवेत नसलेली; परंतु अन्य व्यवसाय करणारी दुकाने चोरून सुरूच होती. काही दुकानांत तर पाठीमागील बाजूने विक्री सुरू होती. काही दुकानांतून लग्नाची खरेदी सुरू आहे. दुकाने सुरू आहेत, साहित्य मिळतंय म्हटल्यावर नागरिक दुकानासमोर गर्दी करतात. बँकांतील गर्दी मात्र काहीशी ओसरली आहे. बँकांच्या दारात सुरक्षारक्षक प्रत्येकांच्या हातावर सॅनिटायझर फवारतात. नागरिकांना एका रांगेतून आत सोडतात.
मंगळवारी दुपारनंतर शहरात पावसाला सुरवात झाली आणि गर्दीवर नियंत्रण राखण्यात काही प्रमाणात यश आले. पावसामुळे दुचाकी वाहनावरून फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली. पावसाची एकसारखी रिपरिप सुरू राहिल्याने रस्ते मोकळे झाले.