कोल्हापूर : राज्यातील पानपट्टीधारकांच्या विविध प्रश्नांबाबत येत्या विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले. कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत यांना मुंबई येथे स्वर्गीय शरद राव स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल अरुण सावंत गौरव समितीतर्फे शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.आमदार क्षीरसागर म्हणाले, सावंत म्हणजे तरुणांना लाजवेल असे चिरतरुण व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट अभ्यास करूनच त्यात पाऊल टाकणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे अरुण सावंत आहेत. त्यांनी जिल्ह्यातील पानपट्टीधारकांना एकत्रित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबई, दिल्ली, आदी ठिकाणी अनेक वेळा चकरा मारून प्रयत्न केले. त्यातून शासन रोज एक नवीन जाचक अटी आणू पाहत आहे. अशावेळी मी आपल्या असोसिएशनच्या पाठीशी सदैव ठाम उभा राहीन.
राज्य शासनाचा एक घटकपक्ष असलो तरी मी ज्या प्रमाणे धनदांडग्या दारू दुकानदारांकरिता राज्य शासनाने महामार्गालगतच्या दुकानांवर दारू विक्री करण्यासाठी बंदी घातली होती. मात्र, काही महिन्यांतच ही बंदी उठविली. त्याप्रमाणे गेल्या सहा वर्षांपासून पानपट्टीमध्ये सुंगधी तंबाखू विक्री करण्यासही बंदी घातली आहे. तीही उठवावी. याकरिता मी स्वत: येत्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून राज्यातील ५ ते ७ लाख पानपट्टीधारकांचा रोजीरोटीचा प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करेन.
यावेळी महाराष्ट्र पान व्यापारी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी संघटनेला बांधून ठेवण्यासाठी सावंत यांच्या रूपाने एक स्तंभ मिळाल्याची भावना व्यक्त केली. तर संघटनेचे तांत्रिक सल्लागार हेमांग शहा, व्यावसायिक गिरीश शहा, सांगलीचे पदाधिकारी रत्नाकर नांगरे, आदींनी मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना सावंत म्हणाले, मुंबई ज्या दोन थोर व्यक्तींच्यामुळे एका हाकेत बंद पडू शकत होती. अशा एका व्यक्तिमत्त्वाच्या अर्थात कामगार नेते शरद राव यांच्या स्मृतीनिमित्त पुरस्कार मिळाला. ही बाब माझ्यासाठी निश्चितच गौरवास्पद आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या संघटनेतील सर्व सभासद, सदस्यांचा आहे.
विशेष म्हणजे माझ्या प्रत्येक कार्यात सदैव सावलीप्रमाणे उभी असणाऱ्या पत्नीमुळे मला हे शक्य झाले आहे. असेही सावंत यांनी प्रांजळपणे कबूल केले. यावेळी उद्योजक रौनक घोडावत, रमेश इंगळे, रवि सावंत, शरद मोरे, विजय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.