कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूकीत विरोधी आघाडीचे अपात्र ठरवलेल्या २९ इच्छुक उमेदवारांच्या पात्रतेचे १ लाख ३० हजार कागदपत्रांचे पुरावे शुक्रवारी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे सादर केले. दोन गाड्यातून कागदपत्रे आणून स्वतंत्र गठ्ठे सादर करत तातडीने याबाबत निर्णय घेण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली. यावर, सोमवार (दि. ३) पर्यंत अपीलची मुदत असल्याने त्यानंतर संबधितांना नोटीसा काढून चौकशी केली जाईल, असे साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी सांगितले. ‘राजाराम’ कारखान्यासाठी दाखल झालेल्या अर्जाची मंगळवारी छाननी झाली, निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांनी विरोधी आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे २९ अर्ज अपात्र ठरवले. पोटनियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका संबधितांवर ठेवला होता. याविरोधात शुक्रवारी प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्याकडे अपील दाखल केले. हे उमेदवार पात्र कसे आहेत, याबाबतचे पुरावे त्यांनी सादर केले. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, मोहन सालपे आदी उपस्थित होते.
kolhapur- राजाराम कारखाना निवडणूक: २९ अर्ज अपात्र ठरवले, सतेज पाटलांनी सादर केली पात्रतेची सव्वा लाखांवर कागदपत्रे
By राजाराम लोंढे | Published: March 31, 2023 1:34 PM