कोल्हापूर : राजारामपुरीत ध्वनियंत्रणेला फाटा; पण डोळे दुखवणारा लेसर लाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 02:09 PM2018-09-14T14:09:29+5:302018-09-14T14:11:50+5:30
धडकी भरणाऱ्या ध्वनियंत्रणेला तिलांजली देत यंदा पारंपरिक वाद्यांच्या गजरात राजारामपुरीतील श्री गणेश आगमनाच्या मिरवणुकीचा नवा पायंडा गुरुवारी पाडला. डोळे दिपवणारा व डोळे दुखवणारा अत्याधुनिक लेसर शो व भव्य वॉलच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या.
कोल्हापूर : धडकी भरणाऱ्या ध्वनियंत्रणेला तिलांजली देत यंदा पारंपरिक वाद्यांच्या गजरात राजारामपुरीतील श्री गणेश आगमनाच्या मिरवणुकीचा नवा पायंडा गुरुवारी पाडला. डोळे दिपवणारा व डोळे दुखवणारा अत्याधुनिक लेसर शो व भव्य वॉलच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या.
गेली काही वर्षे राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत धडकी भरणाऱ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणेचे पडसाद विसर्जन मिरवणुकीत उमटत होते. त्यामुळे यंदा पोलीस प्रशासनाने प्रथम प्रबोधन व नंतर कायद्याचा बडगा दाखवीत मंडळांचे मतपरिवर्तन केले. त्यामुळे यंदा राजारामपुरीतील मंडळाच्या मिरवणुकीत ध्वनियंत्रणा लागणार का? हाच विषय चर्चेचा होता; पण मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा स्वीकार केल्याने पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाला.
मंडळातील पुढे जाण्यावरून होणारी वादावादी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रथमच चिठ्ठ्यांद्वार मंडळांना मिरवणुकीत सहभागाचा अग्रक्रम ठरवून दिला होता. त्यानुसार राजारामपुरी आठ नंबर शाळेपासून सुरू झालेली मिरवणूक शाहू मिल पोलीस चौकी, जनता बझार चौक ते मुख्य रस्ता अशी रात्री उशिरापर्यंत जल्लोषी वातावरणात सुरू होती; पण मिरवणुकीतील ध्वनियंत्रणेला फाटा दिला असला तरीही अत्याधुनिक लेसर शो हा अनेकांचे डोळे दुखवणारा ठरल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
अमृत देशमुख, औदुंबर पाटील एकत्र
राजारामपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अमृत देशमुख व सध्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील हे दोघे गुरुवारी गणेश आगमनावेळी राजारामपुरी जनता बझार चौकात एकत्र थांबले होते. त्यांनी एकमेकांच्या हातात हात दिला. दोन वर्षांपूर्वी देशमुख यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सवाच्या काळात चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली होती.