कोल्हापूर : आरोग्य विभागात शासकीय सेवेत नोकरी लावतो, असे सांगून एक कोटी चार लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांचा लवकरच राजारामपुरी पोलीस शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून ताबा घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.गेल्या आठवड्यात शिरोली एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणी संशयित विजय चव्हाण, हेमंत पाटील, अधिक पाटील, बजरंग सुतार, भास्कर वडगावे व दिलीप कांबळे या सहाजणांवर गुन्हा दाखल असून, त्यांना अटक करण्यात आली. गुरुवारी या सहाजणांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संशयित सचिन हंबीरराव पाटील ऊर्फ गोयल (रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) याचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीवर सातारा जिल्ह्यातील फलटण, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व कोडोली या पोलीस ठाण्यांतही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.बुधवारी (दि. २२) बाबूराव भिकाजी पाटील (रा. उदगाव, ता. शिरोळ) यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी सचिन पाटीलसह विजय चव्हाण, अधिकराव पाटील, बजरंग सुतार, हेमंत पाटील या पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील तपास करीत आहेत.