कोल्हापूर : शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, क्रीडा, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा यांच्या आधारे कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजला ‘नॅक’कडून ए.प्लस प्लस मूल्यांकन प्राप्त झाले. यात शाहू कॉलेजने राज्यात प्रथम, तर देशात द्वितीय क्रमांक मिळविल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य सराेज पाटील, दक्षिण विभागाचे चेअरमन डॉ. एम.बी.शेख, प्राचार्य डॉ. एल.डी.कदम व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अजित पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
२० व २१ जुलैला नॅकच्या टीमने शाहू कॉलेजच्या विविध विभागांना भेट देत मूल्यमापन केले होते. कॉलेजने विद्यार्थ्यांसाठी राबविलेले उपक्रम, सुविधा, क्रीडा, लायब्ररी, स्वच्छता यांचे मूल्यमापन केले. त्याआधारे ‘नॅक’ने या कॉलेजला ए.प्लस प्लस मूल्यांकन दिले. सीजीपीएमध्ये चारपैकी ३.७८ इतका स्कोअर कॉलेजने मिळविला आहे. शाहू कॉलेज चौथ्या वेळी नॅक मूल्यांकनाला सामोरे गेले असून गतवर्षी ‘ए’ मूल्यांकन मिळाले होते.सरोज पाटील म्हणाल्या, कॉलेजने मिळविलेले हे यश आनंददायी असून हे मूल्यांकन कायम ठेवावे. डॉ. कदम म्हणाले, रयत शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे हे साध्य झाले. यात शिपायांपासून सर्व प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षकेतर सेवक व देणगीदार यांचे मोठे योगदान आहे. यावेळी उपप्राचार्या डॉ. एस.जे.आवळे, उपप्राचार्य प्रा. पी.एस.चौगुले, डॉ. शकील शेख, उमेश शेळके उपस्थित होते.
एन.डी.पाटील यांचे स्मारक उभारणारया कॉलेजसाठी एन.डी.पाटील यांचे मोठे योगदान असून कॉलेज परिसरात लवकरच त्यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे डॉ. एम.बी.शेख यांनी सांगितले.विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचा जल्लोष‘नॅक’च्या मूल्यांकनात कॉलेजने अव्वल स्थान पटकाविल्याने गुरुवारी कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी मोठा जल्लोष केला. गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला होता.