कोल्हापूर : राजेेंद्रनगरमधील गुंड कुमार शाहूराज गायकवाड याच्या खूनप्रकरणी हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही दुचाकी तिसऱ्याच व्यक्तींच्या असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. हल्ल्यात वापरलेल्या दोन्ही दुचाकी हल्लेखोरांनी मित्रांकडून तात्पुरत्या कामासाठी मागून आणल्या होत्या, पण गंभीर गुन्ह्यात वापर झाल्यामुळे आता दुचाकींचे मूळ मालक पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
राजेंद्रनगर परिसरातील गुंड कुमार गायकवाड याचा रविवारी (ता. १३) रात्री पाच हल्लेखोरांनी पाठलाग करून टाकाळा खण परिसरात निर्घृण खून केला होता. हल्लेखोरांनी या गुन्ह्यात वापरलेली एक स्कुटी आणि एक वेस्पा अशा दोन्ही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दोन्ही दुचाकी राजेंद्रनगरातील तिसऱ्याच व्यक्तीच्या आहेत. दहा मिनिटांत येतो, असे सांगून या दोन्ही दुचाकी हल्लेखोरांनी मित्रांकडून मागून घेतल्या होत्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून दुचाकींचे नंबर मिळवून दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत.
गुन्ह्याशी थेट काहीही संबंध नसताना दुचाकींचे मूळ मालक आता पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. दोन्ही दुचाकींच्या मालकांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवले जाणार आहे. दुचाकींची योग्य कागदपत्रे सादर केल्यानंतरच कोर्टाच्या आदेशाने मूळ मालकांना दुचाकी मिळतील, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी दिली.
संशयित सोशल मीडिया अकाउंट्सची होणार पडताळणी
गुंड कुमार गाकवाड याच्या खुनानंतर विरोधी गटांना चिथावणी देणारे काही मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. सायबर पोलिसांच्या मदतीने इन्स्टा, फेसबुकवरील संशयित अकाउंटसह काही मोबाइल नंबर्सच्या व्हॉट्सॲप स्टेट्सचीही पडताळणी करणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.
गुन्हेगारी कृत्यांमध्ये आपल्या वाहनांचा वापर होऊ नये, यासाठी वाहन मालकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. - भगवान शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक