कोल्हापूर : वीज जोडणी मंजुरीसाठी कार्यकारी अभियंत्यांकडे अर्ज लवकर पाठविण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात सापडलेले रणजित बाळासाहेब पाटील याला निलंबित करण्यात आले.
कोल्हापूर परिमंडल विभागाने त्याच्यावर सोमवारी (दि. १२) ही कारवाई केली असून, महिन्यातून दोन वेळा सोमवारी व गुरुवारी गडहिग्लज विभागीय कार्यालयात हजेरी देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.रणजित पाटील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या इचलकरंजी कार्यालयात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होता. शासकीय ठेकेदार उमेश माळी यांच्याकडून पाटीलने दोन सदनिकेसह एक आस्थापना व एक घरगुती अशा चार वीज जोडण्यांसाठी संबंधित कार्यालयाकडे मागणी केली होती.
सहा महिने झाले तरी मंजुरी मिळत नसल्याने माळी यांनी पाटीलची भेट घेतली असता त्याने चार कामांसाठी २७ हजार रुपयांची मागणी माळी यांच्याकडे केली. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार माळी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यांनी ८ मार्चला दुपारी इचलकरंजी येथील स्टेशन रोडवरील कार्यालयात ‘एसीबी’ने सापळा लावून पाटील याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर पोलीस कारवाई झाली.
महावितरण कंपनीने ‘एसीबी’च्या अहवालानुसार पाटीलच्या निलंबनाची कारवाई केली. सोमवारी (दि. १२) कोल्हापूर परिमंडल विभागाने निलंबनाचे आदेश दिले. महिन्यातून दोन वेळा सोमवार व गुरुवारी गडहिग्लज विभागीय कार्यालयात हजेरी द्यावी लागणार आहे.
मूळ वेतनात ५० टक्केकपातनिलंबनाच्या कारवाईनंतर महावितरणच्या नियमानुसार रणजित पाटीलच्या मूळ वेतनात ५० टक्के कपात होणार आहे. इतर भत्ते मात्र नियमित राहणार आहेत.