समीर देशपांडे/राजेंद्र पाटीलकोल्हापूर : प्रचंड रहदारी असलेला कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद होण्याला केर्ली परिसरात रस्त्यावर येणारे पाणी कारणीभूत आहे. या ठिकाणी रेडेडोह परिसरात येणारे पाणी दोन-दोन आठवडे या ठिकाणची वाहतूक बंद करून टाकते. या तुंबलेल्या पाण्याचा फटका दहा गावांना बसतो; परंतु याचा शास्त्रीय अभ्यास करून नेमका पर्याय काढण्यासाठी शासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. या परिसरातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर या परिसरात कमानीचे पूल उभारले, तर एका बाजूला तुंबणारे पाणी निचरा होईल, असे सांगण्यात आले.
कोल्हापूर शहरातून रत्नागिरीकडे जाणाऱ्या याच महामार्गावरून किल्ले पन्हाळा आणि देव जोतिबाला रस्ता जातो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या पर्यटक आणि भाविकांची, रत्नागिरीलाही जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मालवाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. पावसाचे प्रमाण वाढले की, या रस्त्यावर पाणी येतेच हे प्रत्येक महापुराने सिद्ध केले आहे; परंतु याबाबत नेमका पर्याय काढण्यात एकीकडे अपयश आले असताना किंबहुना त्याबद्दल सर्वच पातळ्यांवर अनास्था असल्यामुळे गेली अनेक वर्षे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसत आहेत.हा मार्ग जरी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला असला तरी पावसाळ्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल. नवा महामार्ग कोल्हापूरच्या बाहेरून जाणार असल्याने येथील पाण्याच्या निचऱ्याचा मुद्दा सध्या या विभागाच्या प्रस्तावात कुठेच नाही. म्हणूनच आता या परिसरातील महामार्गाचे काम सुरू होण्याआधी पिलरचे किंवा कमानीचे पूल उभारून रेडेडोहाचा तुंब घालण्यासाठीचे पर्याय अवलंबवावे लागणार आहेत.
दहा गावांना बसताेय फटकाचिखली, आंबेवाडी, वरणगे, पाडळी खुर्द, निटवडे, शिंगणापूर, हणमंतवाडी, रजपूतवाडी, केर्ली, वडणगे या दहा गावांना या महापुराचा दरवर्षी मोठा फटका बसतो. जरी पन्हाळा रस्ता बंद झाला नाही तर चिखलीच्या बाजूला तुंबणारे पाणी अनेक दिवस शेतातच राहत असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीला पारावार राहत नाही.
एसटीच्या १७० फेऱ्याकोल्हापूर-रत्नागरी-कोल्हापूर अशा या मार्गावरून रोज १७० फेऱ्या होतात. याशिवाय पर्यटक, भाविक आणि मोठ्या संख्येने नागरिक या मार्गावर प्रवास करत असतात. व्यावसायिक मालवाहतूकही या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर होते. ही सगळी वाहतूक पुराच्या काळात आठ दिवसांपासून बारा, तेरा दिवसांपर्यंत बंद असते. लांबच्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागतो.
रेडेडोहातील पाणी काढण्याची गरजपूर्वी कोल्हापूरचे नागरिक रेडे धुण्यासाठी चिखली, केर्ली परिसरातील डोहात यायचे. म्हणून या परिसराला रेडेडोह म्हटले जाते असे सांगण्यात येेते. कुंभी, भोगावती, तुळशी, कासारी या नद्यांतून वाहणारे पाणी चिखलीतील संगमावर एकत्र येते. तेथील अतिरिक्त पाणी रेडेडोहात येते. जुन्या काळात या ठिकाणी असणारा कच्चा भराव पाण्याच्या दाबाने फुटायचा आणि ‘रेडेडोह’ फुटला असे म्हटले जायचे. हा रेडेडोह फुटला की, पाणी कमी यायचे. त्यामुळेच यंदा अज्ञातांनी चर मारून पाणी घालवण्याचा प्रयत्न केला.
हे धोकादायक२०२१ राजाराम बंधारा ४३ फुटांवर असताना पन्हाळा रस्ता बंद२०२४ राजाराम बंधारा ४१ फुटांवर असताना पन्हाळा रस्ता बंद
महसूल खाते, ग्रामपंंचायती झोपल्याएकीकडे या ठिकाणी पाणी तुंबून वाताहत होत असताना महसूल खाते आणि ग्रामपंचायतींच्या परवानग्या घेत, न घेता याच परिसरात मोठ्या प्रमाणावर भर टाकून मंगल कार्यालये, पेट्राेलपंप, हॉटेल्स उभारण्यात आली आहेत. जर हे भराव टाकण्याचे काम सुरूच राहिले तर कितीही पूल बांधले तरीही पाण्याचा निचरा होणार नाही, हे वास्तव आहे.
कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर ३०/३२ वर्षांपूर्वी १० ते १५ फूट भर घालून रस्ता तयार करण्यात आला आणि पाणी अडायला सुरुवात झाली. परिणामी आमची गावंच्या गावं उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. शेतकऱ्यांना नुकसानीला पारावार राहिला नाही. तुम्ही कमानीचे पूल बांधा किंवा पिलरचे. आमच्या भागातलं पाणी तेवढं वाहतं करा. आता गावातील स्वच्छतेच्या कामातून रिकामे झाल्यानंतर याच मागणीसाठी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना भेटणार आहे. - रोहित पाटील, सरपंच, प्रयाग चिखली, ता. करवीर