कोल्हापूर : मराठी नववर्षारंभ असलेल्या गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी अवघे कोल्हापूर सज्ज झाले आहे. सणाच्या पूर्वसंध्येला पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होती. दुसरीकडे मुहूर्ताच्या खरेदीची वस्तू निवडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होती. मराठी नववर्षारंभाला दारात गुढी उभारून या दिवसाचे स्वागत केले जाते. दारात सुरेख रांगोळी करून पहाटे उंच गुढी उभारली जाते. गुढीचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. आरोग्याचा संदेश देत या दिवशी कडुनिंबाच्या पानांचे सेवन केले जाते. हा दिवस वर्षातील साडेतीन मुहूर्तांतील पहिला पूर्ण मुहूर्त असल्याने शुभकार्याला प्राधान्य दिले जाते तसेच घराघरांत नवनवीन वस्तूंचे आगमन होते. या नववर्षाच्या स्वागतासाठी गेल्या आठ दिवसांपासूनच बाजारपेठेत लगबग सुरू होती. सणाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी रस्ते गजबजून गेले होते.
नववर्षाच्या स्वागतास कोल्हापूर सज्ज
By admin | Published: March 28, 2017 12:10 AM