कोल्हापूर : वेळेत अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांचे समायोजन करून न घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ शाळांमधील ४९ माध्यमिक शिक्षकांच्या जागा रद्द करण्याची शिफारस माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केली आहे. तशी शिफारस पुढील कारवाईसाठी शिक्षण संचालकांकडे करण्यात आली असून, यामुळे संस्थाचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.आॅक्टोबर २0१७ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यामध्ये एकूण १२९ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यातील ९६ शिक्षकांचे जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. मात्र, उर्वरित शिक्षकांचे समायोजन करून घेण्यास संबंधित शाळांनी नकार दिला होता.या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना नोटिसा काढून काही ठिकाणी मुख्याध्यापकांचा पगार थांबविण्यात आला असून, संस्थांचे वेतनेतर अनुदानही रोखण्यात आले आहे. याबाबत सातत्याने बैठका घेऊन शासन निर्णयानुसार अशा शिक्षकांचे समायोजन करून घेणे बंधनकारक असल्याचे शाळा आणि मुख्याध्यापकांना बजावण्यात आले होते.मात्र, तरीही ३७ शाळांनी त्यांच्या ४९ जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून घेण्याची कोणतीही कार्यवाही न केल्याने अखेर ही सर्व पदे रद्द करण्याची शिफारस शिक्षण संचालकांना करण्यात आली आहे. यामुळे आता शिक्षण संस्थाचालक काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.