कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे काम २ वर्षे ८ महिने रखडले आहे. त्यामुळे याचा खर्च आता वाढला असून तो संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाजी पोवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर समग्र अभ्यास न करता घाईगडबडीने काम सुरू करून ते रखडण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर जनहित याचिकाही दाखल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.पोवार म्हणाले, पुलाचे काम पूर्ण व्हावे, अशी सर्वसामान्य कोल्हापूरकरांसह आमचीही इच्छा आहे; परंतु या पुलाचे काम सरू करताना त्याचे नियोजन, आराखडे, अंदाजपत्रके, पिलरच्या पायासाठी दगड चाचणी, बोरींग, जमिनिंचा मालकी हक्क व दोन्ही तिरावरील भू-गर्भाची स्थिती, पावसाळा व वर्षभर पाण्याच्या प्रवाहाचा वेग, नदीतील कॉफर डॅम या सर्व बाबींचा काटेकोर अभ्यास अधिकाऱ्यांनी केलेला नाही. त्यांच्यामुळेच २ वर्षे ८ महिने या पुलाचे काम रखडले.
पुरातत्व विभागाने संबंधित जागा आपली नसल्याचे नुकतेच सांगितले. मग इथून मागे सार्वजनिकसह इतर विभागाचे अधिकारी झोपले होते काय? या हलगर्जीपणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासनाचा डिझाईन विभाग, पुरातत्व विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे संबंधितांविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील केंबळे उपस्थित होते.