कोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफीत अपात्र केलेल्या ६७६ सरकारी कर्मचारी, सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून वसुली सुरू केली आहे. आतापर्यंत ३७४ जणांकडून ५६ लाखांची वसूल करून सरकारी तिजोरीत जमा केले आहेत.राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा सरकारने जून २०१७ मध्ये केली. निकषास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून कर्जमाफीची रक्कमही बहुतांशजणांना अदा करण्यात आली.
सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसह सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, अशी स्पष्ट सूचना कर्जमाफी निकषात होत्या. तरीही या प्रवर्गातील काही शेतकऱ्यांनी अर्ज करून लाभ घेतल्याचे उघड झाले होते.जिल्ह्यातील ६७२ लाभार्थ्यांची नावे राज्य सरकारने जिल्हा बॅँकेकडे दिली होती. त्यांच्याकडून १ कोटी २६ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. पण संबंधित शेतकऱ्यांनी कर्जमाफीची रक्कम खात्यावरून उचल केली होती. त्यामुळे पैसे वसूल कसे करायचे, असा पेच होता.
तरीही जिल्हा बॅँकेच्या यंत्रणेने वसूल मोहीम राबविली. त्यातून ३७४ जणांकडून ५६ लाखांची वसूल झाली आहे. दरम्यान, ६७६ पैकी दोन शेतकऱ्यांनी पैशाची उचल केली नव्हती. त्यामुळे अजून तीनशे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीच्या पैशाची वसुली करावी लागणार आहे.
उर्वरित वसुलीचे बॅँकेसमोर आव्हानसंबंधित शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या पैशाची उचल केल्याने त्यांच्याकडून वसूल कसे करायचे? असा पेच बॅँकेसमोर आहे. त्यातील काहीजणांनी सहकार विभागाकडे तक्रार करून, चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी असल्याने आपण निकषात बसू शकतो, असा दावा केल्याने वसुलीचे आव्हान बॅँकेसमोर राहणार आहे.