कोल्हापूर : गेल्या चार वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपने ‘अच्छे नव्हे तर बुरे दिन’ आणले आहेत. महागाईचा आगडोंब उसळलेला असताना पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात प्रचंड वाढ करून जनतेला वेठीस धरले आहे तरी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे दर कमी करावेत, महागाई कमी करावी या मागणीचे निवेदन बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, महागाईमुळे देशात गेल्या वर्षभरात ११ हजार ४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे भारतातील अब्जाधीशांची यादी वाढतच चालली आहे.
सरकारने टॅक्स वाढवून सरकारी तिजोऱ्या भरल्या, गेल्यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दरानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतील, असा फतवा काढला तेव्हापासून पेट्रोलचा दर ६५ रुपयांवरून ८४ रुपयांवर डिझेलचे दर ५४ रुपयांवरून ७१ रुपयांवर आले आहेत.
अशारितीने जनतेवर ‘स्लो पॉयझनिंग’ केले जात आहे. याउलट इराणमध्ये २४.४९ रुपये, पाकिस्तानमध्ये ५१.६१ रुपये, श्रीलंकेत ६३.७७ व बांगलादेशात ७१.६९ रुपये इतका पेट्रोलचा दर आहे.इंधन दरवाढ नियंत्रित करण्याऐवजी वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ‘जनता प्रामाणिकपणे टॅक्स भरत नसल्याने महागाई वाढल्याचे’ बेजबाबदार विधान केले आहे. अशा या दिवाळखोर सरकारच्या मदतीसाठी आम्ही १२ पैशांचा धनादेश पंतप्रधान सहाय्यता निधीला प्रदान करतो व त्यांनी महागाई कमी करावी.
जीवनावश्यक वस्तूंचे दर संसदेच्या कँटिनमधील दराप्रमाणे कमी करावेत. यावेळी सतीशचंद्र कांबळे रघुनाथ कांबळे, सुमन पाटील, मीना चव्हाण, दिलदार मुजावर, अल्फान वडगावे, स्नेहल कांबळे, शुभांगी पाटील, मारुती आजगेकर, नामदेव पाटील, शिवाजी जाधव, रमेश वडणगेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.