कोल्हापूर : ऐक्य, बंधुभाव अशी परंपरा लाभलेल्या शाहूनगरीत १९५० नंतर प्रथमच सलग तीन वर्षे गणेशोत्सव व मोहरम असे एकत्रित साजरा होत आहे. यंदा बाबूजमाल दर्गा, सरदार तालीम मंडळ, नंगीवली तालीम मंडळ, अवचितपीर तालीम मंडळ, तुकाराम माळी तालीम मंडळ, पंचगंगा तालीम मंडळ, आदी तालीम मंडळांमध्ये पंजा व गणेशमूर्ती एकत्रित प्रतिष्ठापना करण्यात आली आहे; त्यामुळे हिंदु-मुस्लिम धर्मियांमध्ये ऐक्याची वीण आणखी घट्ट होण्यास मदत होणार आहे.
कोल्हापुरातील गुरुवार पेठ येथील बाबूजमाल दर्गा येथे ‘हजरत नाल्या हैदर कलंदर’ पंजा व गणेशमूर्तीची एकत्रितपणे प्रतिष्ठापना केली आहे.(छाया : नसीर अत्तार )एकोणीसशे पन्नासनंतर यापूर्वी १९५६, ५७, ५८ आणि १९८५, ८६, ८७ असा सलगपणे गणेशोत्सव व मोहरम एकत्रितपणे साजरा करण्याचा योग आहे. त्यानुसार यावर्षी २०१८, पुढील वर्षी २०१९ व त्यानंतर २०२० साली पुन्हा हा योग आला आहे.
यंदा गुरुवार पेठेतील बाबूजमाल तालीम मंडळ दर्गा येथे ‘हजरत नाल्या हैदर कलंदर पंजा’, बेबी फातीमा पंजा, तर खरी कॉर्नर परिसरातील अवचित पीरचा ‘ सात अस्मान के बादशहा ‘शेर-ए: खुदा मौला अली अवचितपीर’, शिवाजी पेठेतील सरदार तालीम मंडळाचा ‘चाँदसाब’ पंजा, नंगीवली तालीम मंडळचा ‘हजरत पीर नंगीवली साहेब’ पंजा या पंजासह तुकाराम माळी तालीम मंडळ, पंचगंगा तालीम मंडळ या ठिकाणी गणेशमूर्ती व पंजे एकत्रितपणे प्रतिष्ठापना करण्यात आले आहेत.
यासह बाराईमाम तालीम मंडळ, छत्रपती घराण्याचे सरकारी पंजे, मिलिटरी परिसरातील ‘दस्तगीर हजरत मेहबुब सुबहानी पंजा‘, शिवाजी चौकातील घुडणपीर पंजा, आदी ठिकाणीही पंजे प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. बाबूजमाल दर्गा येथील पंजा मंगळवारी (दि. १७) व बुधवारी (दि. १८) ला भव्य मशाली, अबदागिरी, मोर्चंद यासह धावत भेटीसाठी भवानी मंडपातील सरकारी पंजे, घुडणपीर, बाराईमाम, आदी ठिकाणी भेट देणार आहे.