कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्याविरोधात सुरू असलेल्या दाव्यात माघार न घेतल्याने समितीने आमची अन्य देवस्थानांवर बदली केली आहे असा आरोप निवृत्त जवान असलेल्या सुरक्षारक्षकांनी केला आहे. समितीने मात्र आकसापोटी अशी कोणतिही गोष्ट घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे.देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी समितीने २००७ साली निवृत्त जवान असलेल्या पंधरा जणांची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांना सुरवातीपासून सात हजार रुपये पगार होता. अनेक वर्षे समितीने पगारवाढ न केल्याने हे सुरक्षारक्षक कामगार न्यायालयात गेले.
यात त्यांनी शासकीय नियमाने पगारवाढ व्हावी व त्यांना कायमसेवेत घेण्याचा करार व्हावा अशी मागणी केली. न्यायालयाने आॅगस्ट २०१७ मध्ये या सुरक्षारक्षकांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात तक्रार केली आहे.समितीच्या मासिक बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर कोर्टकचेऱ्या करण्यापेक्षा तडजोड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्व सुरक्षा रक्षकांना बोलावून चर्चा करण्यात आली. त्यांना पगारवाढ आणि २००७ सालापासूनचा फरक म्हणून ८ लाख रुपये, व वयाच्या साठ वर्षांपर्यंत नोकरीत ठेवण्यावर तडजोड झाली.
या तडजोडीनंतर दहा सुरक्षारक्षकांनी दाव्यातून माघार घेतली मात्र पाच जणांनी त्यास नकार दिला. या नकारानंतर देवस्थान समितीने त्यांच्या सावंतवाडी, जोतिबा, ओढ्यावरील गणेश मंदिर, त्र्यंबोली मंदिर अशा ठिकाणी बदल्या केल्याचा आरोप केला आहे.