कोल्हापूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार लाभार्थ्यांना गॅस जोडणी दिली आहे. आता १८ डिसेंबरपासून दुसरा टप्पा सुरू झाला असून, मार्चपर्यंत उर्वरित ३० हजार जणांना गॅस जोडणी देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियमचे वरिष्ठ अधिकारी अलोक कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.अलोक कुमार म्हणाले, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मार्चपर्यंत ‘बीपीएल’ कुटुंबांच्या महिला सदस्यांना पाच कोटी गॅस जोडणी कनेक्शन आणि मार्च २०२० पर्यंत अतिरिक्त तीन कोटी गॅस जोडणी करण्यासाठी १२,८०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. ही योजना केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केली आहे. आज या योजनेने पाच कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
या योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात येणार असून नवीन ७ वर्ग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, अंत्योदय अन्न योजना, वनवासी, सर्वाधिक मागासवर्गीय, टीए आणि एक्स बेट गार्डन जमाती, बेटे तसेच नदीबेटांवर राहणारे लोक यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. तसेच पिवळे रेशनकार्ड धारक व गरीब कुटुंबातील लोकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट समितीने गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याचा नवीन निर्णय दिला आहे. ज्या गरीब कुटुंबांना गॅस, स्टोव्ह खरेदी करण्यासाठी प्रथम आगाऊ पैसे भरता येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे. यावेळी थोरात गॅस एजन्सीचे व्यवस्थापक सागर पाटील उपस्थित होते.
जिल्ह्यात १ लाख ४५ हजार गॅस जोडण्याजिल्ह्यात या योजनेंतर्गत ९१ टक्के लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेंतर्गत ‘एचपीसी’ने ८० हजार, ‘बीपीसी’चे ३५ हजार, ‘आयओसी’चे ३० हजार २०० असे मिळून १ लाख ४५ हजार २०० लाभार्थ्यांना गॅस जोडण्या दिल्या आहेत.