कोल्हापूर : सर्किट बेंच प्रश्नी शेंडा पार्क येथील ७५ एकर जागेबाबत १३ विविध सरकारी कार्यालयाचा अभिप्राय मागवून त्याचा परिपूर्ण अहवाल पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना येत्या सोमवार (दि. ३०) पर्यंत देऊ, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सोमवारी दिले.सर्किट बेंचसाठी दिलेल्या जागेची वस्तुस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस, जिल्हा सरकारी वकील अॅड. विवेक शुक्ल यांनी शिंदे यांच्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली.यावेळी अॅड. चिटणीस म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सहा जिल्ह्याचे सर्किट बेंच व्हावे, यासाठी शासनाकडे शेंडा पार्कातील ७५ एकर जागेची मागणी बार असोसिएशनने केली आहे. याबाबत महापालिकेने दोन वर्षांपूर्वी ठराव केला आहे.
गेल्या आठवड्यात पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यांनी शेंडा पार्क (ता. करवीर) येथील (रि. स. नं. ५८९ ते ७०९) येथील जागेच्या प्रस्तावात त्रुटी काढल्या आहेत. या त्रुटींची जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर्तता करून द्यावी.बैठकीस बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. महादेवराव आडगुळे, विद्यमान उपाध्यक्ष अॅड. आनंदराव जाधव, सेक्रेटरी अॅड. सुशांत गुडाळकर, अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रकाश मोरे, माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे यांच्यासह करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, आरोग्य, वन, भूमी अभिलेख, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्किट बेंच प्रश्नी सध्या सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या गाठी-भेटी सुरू आहेत. तसेच शेंडा पार्कातील जागेबाबत आम्ही सकारात्मक आहोत. त्यावर निर्णय काय होतो? त्यावर या प्रश्नी पुढील दिशा ठरविणार आहोत.-अॅड. प्रशांत चिटणीस, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन.