कोल्हापूर : शहरातील काही प्रमाणात व्यवहार सुरू झाले असले तरी वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा असलेली के. एम. टी. बससेवा मात्र अजून काही दिवस बंदच ठेवावी लागणार आहे. शहर वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यास राज्य सरकार अथवा जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाही.
के . एम. टी. बस सेवा २२ मार्चपासून पूर्णत: बंद आहे. त्यामुळे रोजचे सुमारे साठेआठ लाख रुपयांचे नुकसान प्रशासनाला सोसावे लागत आहे. सोमवारपासून काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल होत असल्यामुळे के. एम. टी. तसेच अॅटो रिक्षा वाहतुकीला परवानगी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अशी परवानगी मिळाली नसल्याने शहर बस वाहतूक अजून काही दिवस बंद ठेवावी लागत आहे.
खासगी कारखानदारांनी मागणी केल्यास त्यांच्या कामगारांची ने आण करण्याची तयारी केएमटी प्रशासनाने दाखविली होती, परंतु मंत्री मेटॅलिक वगळता अन्य कोणत्याही कारखानदारांनी बसेसची मागणी केलेली नाही. राष्टÑीय महामार्गावरील कणेगाव फाटा येथे दोन बसेस तैनात आहेत. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनी कणेगाव येथून सीपीआर हॉस्पिटलपर्यंत आणले जाते. तेथून पुन्हा त्यांना संस्थात्मक अलगीकरण कें द्रात पोहचविण्याची जबाबदारी दोन बसेस पार पाडत आहेत.