कोल्हापूर : केंद्रीय अर्थसंकल्पातून मॉडेल स्टेशनची उभारणी आणि विविध प्रलंबित कामांसाठी भरीव निधी मिळेल. कोल्हापूर- मुंबई, कोल्हापूर-अहमदाबाद आदी मार्गांवर नवीन रेल्वे सुरू होईल, आदी स्वरूपातील कोल्हापूरकरांना अपेक्षा आहे. प्रत्यक्षात कोणत्या कामांसाठी किती निधी मिळाला, कोणत्या नव्या रेल्वे सुरू होणार, याबाबतची माहिती अर्थसंकल्पाबाबतचे ‘पिंक बुक’ खुले झाल्यानंतर दोन दिवसांमध्ये समजणार असल्याचे रेल्वेशी संबंधित घटकांनी सोमवारी सांगितले.
प्रतिक्रिया
गेल्या महिन्यात रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकांनी कोल्हापूरला भेट दिली. त्यामुळे येथील मॉडेल स्टेशन, रेल्वे स्थानकावरील प्रलंबित कामे आणि कोल्हापूर-वैभववाडी मार्गाच्या कामासाठी भरीव निधी मिळण्यासह येथून नवीन रेल्वे मार्ग सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र, याबाबत अचूक माहिती उपलब्ध नाही. ‘पिंक बुक’ खुले होण्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत.
- शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती.
प्रतिक्रिया
या बजेटमध्ये रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतुकीच्या व्यवस्थेसाठीचा कॉरिडॉर करण्यासाठी अधिक जोर दिला आहे. त्याचा फायदा उद्योग, व्यवसायांना होणार आहे. कोल्हापूरसाठी नेमक्या कोणत्या तरतुदी केल्या आहेत. त्याबाबतची माहिती दोन दिवसांत समजेल.
-विज्ञानंद मुंडे, संचालक, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स
चौकट
निधीची तरतूद पाहता कोल्हापूरला आशा
या अर्थसंकल्पामध्ये नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण, ट्रॅफिक सुविधा, विद्युतीकरण आदींसाठी निधीची चांगली तरतूद करण्यात आली आहे. याबाबत कोल्हापूर विभागामध्ये विविध कामे सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापूरला चांगला निधी मिळण्याची आशा आहे.