कोल्हापूर: वीज बिल भरणार नाही म्हणजे नाहीच, भले आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण आम्ही माफी घेणारच, रस्त्यावर उतरणारच असा दृढनिश्चय करत गुरुवारी कोल्हापुरकरांनी भव्य वाहन रॅलीद्वारे सरकारला वीज बील माफीचा निर्णय घ्या, अन्यथा आणखी परिस्थिती गंभीर होईल, असा इशारा दिला. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना निवेदन देण्यात आले. मोटरसायकल, रिक्षा, ट्रक, ट्रॅव्हल बस आदिसह निघालेल्या या मोर्चाने सकाळी १० ते दुपारी दीडपर्यंत अवघे शहर जाम केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या.वीज बिल भरणार नाही कृती समितीने गुरुवारी लॉकडाऊनकाळातील संपूर्ण वीज बील माफीसाठी वाहन रॅलीचे आयोजन केले होते. वीज बिल भरणार नाही, असे फलक वाहनांना लावून गांधी मैदानातून दहा वाजता रॅलीला सुरुवात झाली.
बिनखांबी गणेश मंदीर, महाद्वार, पापाची तिकटी, महापालिका चौक, सीपीआर, दसरा चौक, बिंदू चौक, आझाद चौक, उमा टॉकीज, बागल चौक, शाहू मिल चौक, सायबर, शाहू नाका, मध्यवर्ती बसस्थानक, स्टेशनरोड या प्रमुख मार्गावरुन मार्गक्रमण करत ही रॅली दुपारी पावना एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचली.
वाहने पुढे मार्गस्थ झाली. कृती समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे यांना निवेदन देऊन जनतेच्या भावना सरकारकडे कळवा, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलने होतील असा इशारा दिला. दरम्यान यावेळी पुर्वपरवानगी घेऊन मोर्चा काढला असताना आणि पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गानेच शांततेने मोर्चा काढला असतानाही प्रशासनाने मोर्चाला आडकाठी का आणली, यावरुन शिष्टमंडळाने जाब विचारत प्रशासनाचा निषेध नोंदवला.स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी हे बिनखांबी येथून रॅलीत सहभागी झाले व पापाची तिकटीनंतर ते निघूनही गेले. प्रताप होगाडे हे देखील बैठकीकरता दिल्लीला गेल्याने ते येऊ शकले नाहीत. प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीत निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व इरीगेंशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर, बाबासाहेब पाटील भूयेकर, कृती समिती निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, जालंदर पाटील, बाबा इंदूलकर, जयकुमार शिंदे, सुभाष जाधव यांनी केले. त्यांच्यासोबत मारुती पाटील, विजय करजगार, सुजित चव्हाण, सुरेश जरग, प्रकाश केसरकर, भाऊ घोगरे, सुनिल कदम, सत्यजित कदम, राहूल चिकोडे हे सहभागी झाले.