कोल्हापूर : निसर्गमित्र या संस्थेने आवाहन केल्यामुळे सरनोबतवाडी येथील शालेय विद्यार्थांनी फटाके न उडविण्याचा संकल्प केला आहे. या विद्यार्थ्यांनी तशा आशयाची संकल्पपत्रे तर लिहून दिली आहेतच, शिवाय सुमारे १५० पत्रे लिहून व्यापारी व उद्योजक वर्गाला फटाके न उडविण्याचे आवाहनही केले आहे. या संकल्पपत्रामध्ये एकूण ८१ हजार रुपयांचे फटाके उडविले जाणार नाहीत, असा संकल्प या विद्यार्थ्यांनी केला.निसर्गमित्र संस्थेने दिवाळीनिमित्त फटाकेमुक्त अभियान सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील विकास विद्यामंदिर येथे पर्यावरण रक्षण, प्रगतीचे लक्षण या विषयावर निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. एस. बडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अभय कोटणीस उपस्थित होते.
चौगुले यांनी फटाक्यांचा शोध आणि इतिहास याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, फटाक्यांतून भूमी, पाणी, हवा, ध्वनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होऊन त्यातून बाहेर पडणारे विषारी वायू मानवी आरोग्यास घातक आहेत. कचराही मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे फटाके न उडवता निसर्ग सहल, किल्ला भ्रमंती, पुस्तक, खेळणी खरेदी, गरीब व होतकरूंना मदत करण्यास विद्यार्थ्यांनीच प्रयत्न करावेत.
उद्योग, व्यवसाय करणारे मोठ्या प्रमाणात फटाके उडवत असतात, त्यांना एस.एम.एस., व्हॉट्सअॅप, पत्राद्वारे फटाके न उडविण्याचे आवाहन करावे, असे आवाहन प्रमुख पाहुणे अभय कोटणीस यांनी केले. यावेळी त्यांनी फटाके न उडवणाऱ्या मुलांनी संकल्पपत्रे लिहून दिवाळीमध्ये होणाऱ्या आर्थिक उलाढालीचा ताळेबंद सादर करावा, असेही आवाहन केले. शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. भरत कुंभार यांनी आभार मानले.