कोल्हापूर : कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला लागणारी अतिरीक्त जमिनीचा प्रश्न लवकरच सोडवू, अशी ग्वाही महापौर शोभा बोंद्रे यांनी गुरुवारी कॉ. गोविंद पानसरे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिली. यासंदर्भातील सर्व तांत्रिक अडचणी दूर करुन लवकरच तसा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात येईल, असेही महापौरांनी सांगितले.समाजातील तळागाळातील कष्टकरी, श्रमिक, नोकरदार यांच्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेल्या कॉ. गोविंद पानसरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिकेने घेतला असून त्यासाठी निधीचीही तरतुद करण्यात आली. वास्तुविशारद राजेंद्र सावंत यांनी स्मारकाचे संकल्पचित्र निश्चित केले आहे.
प्रस्तावित आराखड्यात झालेल्या बदलामुळे स्मारक उभारणीसाठी आणखी काही जागा लागणार आहे. त्याकरीता स्मारकाच्या शेजारील मोकळी जागा महानगरपालिकेने उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचा निर्णय न झाल्याने हे काम रखडले आहे. म्हणून पानसरे संघर्ष समितीच्या सदस्यांनी गुरुवारी महापौर बोंद्रे यांची भेट घेतली.पानसरे यांचे स्मारक लवकरात लवकर व्हावे ही कोल्हापूरकरांची इच्छा असून त्याकरीता महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे स्मारकाचे काम रखडले आहे. या तांत्रिक अडचणी दूर करुन कामाला तातडीने सुरवात करावी, अशी विनंती मेघा पानसरे व दिलीप पवार यांनी महापौर बोंद्रे यांना केली.
स्मारकाच्या जागेजवळील विद्युत मंडळाचा एक ट्रान्स्फॉर्मर असून तोही तेथून हटविला पाहिजे अशी सुचना पवार यांनी केली. यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत उपस्थित होते. स्मारकासाठी लागणारी अधिकची जागा देण्याबाबतचा प्रस्ताव सध्या आयुक्तांच्या टेबलवर असून येत्या महासभेत तो मंजूरीसाठी ठेवण्यात येईल, असे सरनोबत यांनी स्पष्ट केले.महापौर बोंद्रे यांना भेटलेल्या संघर्ष समितीच्या शिष्टमंडळात सुशीला यादव, रघुनाथ देशिंगे, जमीर शेख, आ. आशा कुकडे, बाबा यादव, एम. बी. पडवळे, उमेश पानसरे, आनंदा गुरव, बळवंत पवार, सदाशिव निकम, विक्रम कदम, मल्हार पाटील यांचा समावेश होता.