कोल्हापूर : आपलीच होणारी कुचंबणा थेट पडद्यावर पाहायला मिळाल्याने शाळकरी मुलींनी अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ चित्रपटाला गुरुवारी चांगला प्रतिसाद दिला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने शुक्रवारी ५३५ मुलींना हा चित्रपट दाखविला.‘मासिक पाळी व्यवस्थापन’ हा महिलांच्या, किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी निगडित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याची जाणीवजागृती व्हावी, तसेच वैयक्तिक स्वच्छता व सॅनिटरी नॅपकिन वापराबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने शासनाकडून सर्व जिल्ह्यांमध्ये हा चित्रपट दाखविला जात आहे.मुलींनी वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे असून, या विषयाबाबत संकुचितपणा सोडून आई, बहीण किंवा शिक्षिकांशी खुलेपणाने संवाद साधला पाहिजे, असे मत यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त करून मुलींशी संवाद साधला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी या उपक्रमामागील हेतू सांगितला.यावेळी सभापती अंबरीश घाटगे, शुभांगी शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले उपस्थित होते. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी व्यक्त केले. शिक्षक बॅँकेच्या वतीने मुलींना अल्पोपाहार देण्यात आला.