कोल्हापूर : आपण आपल्या परिसरात स्वच्छता ठेवली तर आजारांना आमंत्रण मिळणार नाही. रोगराई टळेल. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आले नाहीत तर स्वच्छता ही व्यक्तीचे कर्तव्य व जबाबदारी आहे, हे ओळखून आपण ती पाळली पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर शहरातील स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अॅम्बॅसडर डॉ. मधुकर बाचूळकर यांनी मंगळवारी (दि. ९) येथे बोलताना केले.कोल्हापूर महानगरपालिका आणि शेल्टर असोसिएट्स या सामाजिक स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या घरोघरी शौचालय प्रकल्पाच्या अनावरणप्रसंगी बाचूळकर बोलत होते. यादवनगर येथे मंगळवारी ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्या हस्ते तसेच वस्तीतील १२५ व्या शौचालयाचे उद्घाटन बाचूळकर यांच्या हस्ते झाले.
सध्या वस्तीत सुरू असलेल्या ‘स्वच्छ गल्ली, सुंदर गल्ली’ स्पर्धेत सहभागी झालेल्या गल्ल्यांना त्यांनी भेट दिली.परिसरातील रहिवाशांनी कोल्हापूर शहराचा परिसर स्वच्छ ठेवून ‘माझी गल्ली, सुंदर गल्ली’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छतेचा संदेश व आदर्श निर्माण करून दिला आहे.
या कार्यक्रमास पर्यावरण अधिकारी विराज कोप, स्वच्छता निरीक्षक अनंत पाटणकर, संजय कवाळे, कंत्राटदार कोल्हेकर व शेल्टर संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.