कोल्हापूर : गांधीनगर रस्त्यावरील तावडे हॉटेल ते निगडेवाडी रस्त्यावरील अवैध बांधकामप्रकरणी सर्वोच्च न्यायालय २८ सप्टेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. मंगळवारी याप्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान उचगाव येथील याचिकाकर्त्यांनी त्यांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले.तावडे हॉटेल ते निगडेवाडी रस्त्यावरील अनेक बांधकामे ही महानगरपालिकेच्या हद्दीत आणि तिही आरक्षणातील जागांवर असल्याचा निवाडा मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता.
त्याविरुद्ध उचगाव परिसरातील काही नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आव्हान दिले आहे. त्यावेळी न्यायालयाने जैसे थे चा आदेश दिला होता आणि बांधकामविषयक सध्यस्थिती दर्शविणारा अहवाल, छायाचित्रे सादर करण्याचा आदेशही दिला होता.
त्यानुसार महापालिका नगररचना विभागाने तसा अहवाल प्रतिज्ञापत्राद्वारे २ आॅगस्ट रोजी दिला. त्यावेळी या अहवालावर अभ्यास करून आपले मत सादर करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी मुदत वाढवून घेतली होती.
मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले; त्यामुळे पुढील सुनावणी २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. कदाचित या दिवशीच अंतिम आदेश होण्याची शक्यता आहे.