कोल्हापूर : सन २००६-०९ मधील सेवानिवृत्त प्राध्यापकांनी सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी उच्चशिक्षण सहसंचालकांना प्रस्ताव द्यावेत. त्याबाबत काही समस्या असल्यास त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशन आॅफ कॉलेज अॅन्ड युनिव्हर्सिटी सुपर एॅन्युएटेड टीचर्सचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष डॉ. मानसिंगराव जगताप यांनी केले.कदमवाडी येथील भारती विद्यापीठामध्ये झालेल्या या असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते. डॉ. जगताप म्हणाले, सन २००६-०९ मधील सेवानिवृत्त प्राध्यापकांना त्यांनी घेतलेल्या शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तीवेतन हे सहाव्या वेतन आयोगानुसार देण्याचा निर्णय झाला आहे. त्याबाबतचा शासकीय आदेश दि. २८ डिसेंबर २०१८ रोजी काढला आहे.
पाचव्या वेतनामध्ये सेवानिवृत्त झालेल्या सभासदांची ही निवृत्तीवेतन सुधारित होत आहे. त्याबाबतचे प्रस्ताव या सेवानिवृत्त प्राध्यापकांनी महाविद्यालय आणि प्राचार्यांच्या माध्यमातून कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना सादर करावेत. या बैठकीस प्रा. मारुतराव मोहिते, डी. यु. पवार, अशोकराव जगताप, माधव घाडगे, संभाजीराव पाटील, विद्या कुरणे, व्ही. के. मोरे, आदी उपस्थित होते.
औरंगाबादमध्ये ११ जानेवारीला बैठकअखिल भारतीय प्राध्यापक प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य एम. ए. वाहुळ, प्राचार्य डॉ. शफी यांचा अमृतसोहळा दि. ११ जानेवारीला औरंगाबाद येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. या कार्यक्रमानंतर दुपारी तीन वाजता राज्य संघटनेची बैठक आहे. त्यामध्ये सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा होणार आहे, असे डॉ. जगताप यांनी सांगितले.