कोल्हापूर : माझ्या ट्वीटर अकाउंटचे सिस्टीम आॅडिट करण्यात येत आहे. त्यातील निष्कर्षांनंतर तक्रार नोंदविण्याबाबतची पुढील कार्यवाही करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगितले. त्यांचे ट्वीटर अकाउंट पूर्ववत सुरू झाले.मंत्रालयातील महत्त्वाच्या निर्णयांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्याच्या उद्देशाने मंत्री पाटील यांनी सन २०१४ मध्ये ट्वीटर अकाउंट सुरू केले. १३ हजार इतके त्यांचे फॉलोअर्स आहेत.
त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार बुधवारी (दि. ७) समजला.त्यांचा सोशल मीडिया हाताळणाऱ्या टीमने याची माहिती मंत्री पाटील यांना कळविली. त्यासह संबंधित अकाउंटचा वापरही थांबविला.
माझं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यामुळे माझ्या अकाऊंटवरून कोणत्याही प्रकारच्या पोस्टनां केलं गेलेलं लाईक अथवा रीट्विट ग्राह्य धरले जाऊ नये. यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात येत आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 6, 2018
अकाउंट हॅक झाल्याबाबत मंत्री पाटील यांनी सांगितले की, ट्वीटर अकाउंटचे सिस्टीम आॅडिट करण्याची सूचना माझ्या सोशल मीडियाच्या पथकाला दिली आहे. त्यांच्याकडून संबंधित आॅडिटचे काम सुरू आहे.
त्यामध्ये अकाउंटबाबत नेमके काय झाले, याबाबतचे निष्कर्ष व माहिती मिळणार आहे. या निष्कर्षानंतरच पुढील कार्यवाहीचा निर्णय घेणार आहे. दरम्यान, मंत्री पाटील यांचे ट्वीटर अकाउंट गुरुवारी पूर्ववत सुरू झाले.