कोल्हापूर : कागलचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी कागल शहरात कायदा व सुव्यवस्था चांगली राखली आहे. त्यांची नियमबाह्य झालेली बदली रद्द करून त्यांना पूर्ववत कागल येथे रुजू करावे, अशी मागणी कागलमधील नागरिकांनी मंगळवारी केली.पाटील यांच्याबाबत निर्णय न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा, महामार्ग रोको व उपोषण करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रश्नी गुरुवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेण्यात येणार असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात नगराध्यक्षा एम. आर. माळी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेतली. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) सतीश माने उपस्थित होते.औदुंबर पाटील यांनी कागल शहराला शिस्त लावण्याचे काम केले आहे. मुली-महिला सुरक्षा आणि अतिक्रमण, पार्किंगचा प्रश्न मिटविला आहे. त्यामुळे आता कुठे शहराला शिस्त लागत असताना त्यांची अचानक पोलीस मुख्यालयात बदली झाली. ती अन्यायकारक आहे. कागल नगरपरिषद इमारतीच्या जळीत दुर्घटनेचा तपास हा अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातील आरोपीसुद्धा सापडला आहे. असे असताना त्यांच्या बदलीमागे कोण आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, पाटील यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांना पूर्ववत कागलला आणावे. जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील यांनी, अशा धाडसी अधिकाऱ्याची कागलला गरज आहे. त्यांना पुन्हा या ठिकाणी रुजू न केल्यास या प्रश्नी उग्र आंदोलन उभारू, असे सांगितले.यावेळी उपनगराध्यक्ष प्रवीण काळभोर, पंचायत समितीचे उपसभापती रमेश तोडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, चंद्रकांत गवळी, प्रकाश गाडेकर, आदींनी मते व्यक्त केली. शिष्टमंडळात प्रकाश कांबळे (बेलवळे बुद्रुक), नीता मगदूम, राजश्री माने, किरण कुलकर्णी, प्रमोद पाटील, संजय फराकटे, पद्मजा भालबर, शामराव सुदर्शनी, आदींचा सहभाग होता.
औदुंबर पाटील यांना तांत्रिक कारणामुळे पोलीस मुख्यालयात आणण्यात आले आहे. त्यांची बदली झालेली नाही.- सूरज गुरव,पोलीस उपअधीक्षक, करवीर.