कोल्हापूर : मुलगी हीसुद्धा हिंदू कुटुंबांची कर्ता होऊ शकते; त्यामुळे मुलींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवू नका. वडिलोपार्जित संपत्तीत हिंदू मुलींचा कायदेशीर हक्क समान आणि अबाधित आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित यांनी केले.कोल्हापूर जिल्हा विधि सेवा प्रााधिकरण आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन यांच्यातर्फे येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये अॅड. अरविंद च. शहा स्मृती व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना न्यायमूर्ती ललित हे ‘हिंदू महिलेचा सहहिस्सेदार म्हणून वडिलोपार्जित संपत्तीत असणारा हक्क व त्याची सध्याची कायदेशीर परिस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन करीत होते.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जयपाल पाटील, जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. लव्हेकर हेही प्रमुख उपस्थित होते.न्यायमूर्ती ललित म्हणाले, हिंदू वडिलोपार्जित संपत्तीत कर्ता कोण? महिला कर्ता होऊ शकते का? सध्या कुटुंबातील मोठी मुलगी समान सहहिस्सेदार असल्याने तिला मुलांइतकाच समान हक्क आहे. मग मला कायद्याने विद्यार्थी म्हणून वाटते की, हिंदू स्त्रीसुद्धा मग कर्ता का होऊ शकत नाही?
दिल्ली उच्च न्यायालयाने एका न्यायनिवाड्यात स्पष्ट केले की, मोठी मुलगी हीसुद्धा हिंदू कुटुंबाची कर्ता होऊ शकते. आपण ‘बेटी बचाव - बेटी पढाव’चा नारा देताना अशा वेळी आपल्या मुली खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांना हक्कापासून वंचित ठेवू नका, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.निवृत्त न्यायमूर्ती जयपाल पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात उलट तपासात अॅड. अरविंद शहा हे निष्णात वकील होते. त्यांच्या अनेक खटल्यांबाबत त्यांनी ऊहापोह करीत गुरू म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.प्रारंभी न्यायमूर्ती ललित यांची ओळख जिल्हा व विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी करून दिली. प्रास्ताविकात अॅड. संतोष शहा यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश सांगितला.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. लव्हेकर आणि जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी मार्गदर्शन केले; तर अॅड. ओंकार देशपांडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. विल्सन नाथन व नताशा मार्टिन यांनी केले. कार्यक्रमासाठी न्यायाधीश, जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील वकील, शहाजी लॉ कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.