कोल्हापूर : शंभर कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाला शुक्रवारी वेगळे वळण लागले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बगलबच्च्यांमुळे रस्त्याची कामे रखडल्याचा आरोप कोल्हापूर शहर जिल्हा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील बैठकीत केला. या बगलबच्च्यांना उपठेकेदार म्हणून कामे पाहिजे आहेत, त्यासाठी मुख्य ठेकेदारावर दबाव आणला जात असल्याचा पदाधिकाऱ्यांनी दावा केला. मात्र, असा कोणाचाही दबाव आपल्यावर नसल्याचा खुलासा प्रकल्प व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांनी बैठकीतच केला.शहरातील रस्त्यांची कामे रखडल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समितीने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना सोमवारी घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सरनोबत यांनी रस्त्याचे ठेकेदार, कृती समितीचे पदाधिकारी, महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांचे उपशहर अभियंता यांची संयुक्त बैठक घेतली.बैठकीत कृती समितीने गंभीर आरोप करून त्याला वेगळे वळण दिले. बैठक सुरू झाल्यापासून अशोक पोवार, रमेश मोरे हे ठेकेदाराचे प्रतिनिधी सत्तार मुल्ला यांना तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? अशी वारंवार विचारणा करीत होते. तुमच्यावर कोणी दबाव टाकत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमची भूमिका फक्त शहरातील रस्ते चांगले व्हावेत आणि ते लवकर व्हावेत, एवढीच असल्याचे सांगत होते. तर ठेकेदाराचे प्रतिनिधी असा कोणाचा दबाव नसल्याचे सांगत होते.जर कोणाचा दबाव नसेल तर मग रस्त्यांच्या कामाची गती का वाढवत नाही? अशी विचारणा केल्यावर मुल्ला शांतच बसून राहिले. त्यावेळी पोवार व मोरे यांनी थेट आरोप केला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बगलबच्च्यांना उपठेकेदार म्हणून सोळा रस्त्यांची कामे पाहिजे आहेत. त्यासाठी ते ठेकेदारावर दबाव टाकत आहेत. म्हणूनच कामांना विलंब होत आहे, असे पोवार म्हणाले. आम्ही कोणा मंत्र्यांना घाबरत नाही, तुमच्यावर दबाव असेल तर सांगा, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत, असेही पोवार व मोरे यांनी सांगितले.तेरा रस्ते कामास उपलब्धसोमवारी ठेकेदाराच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांनी महापालिकेकडून रस्त्यातील सेवा वाहिन्यांची कामे पूर्ण झाली नसल्याने कामात अडथळे येत असल्याची तक्रार केली होती. याबाबतचा जाब शहर अभियंता सरनोबत यांना विचारला. त्यावेळी पाच रस्ते तयार करण्यात कसलीच अडचण राहिलेली नाही. शिवाय, अन्य आठ रस्तेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे स्पष्टीकरण सरनोबत यांनी दिले.
पाच रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणारज्या पाच रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी करण्याची सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केली आहे, ती कामे वेळेत पूर्ण केली जातील. कामाची गतीही वाढविण्यात आली आहे, असे मुल्ला यांनी पुन्हा सांगितले.