कोल्हापूर : आयसीआयसीआय बँक, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी), वीरशैव सहकारी बँक, राजे विक्रमसिंह घाटगे कागल को-आप बँक आणि एक पतसंस्था व तीन सराफांकडे २ किलो ९१ ग्रॅम बनावट सोने तारण ठेवून तब्बल ३९ लाख ३२ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या दहा जणांच्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. या टोळीत दोन महिलांचाही समावेश आहे.
मुळ तांब्याच्या दागिन्यांवर सोन्याचा जाड मुलामा देवून हे सोने बँकेत तारण ठेवले जात असे. विशेष म्हणजे हा मुलामा एवढा जाड होता की बँकेच्या सोने तपासणी यंत्रालाही त्यातील खोटेपणा लक्षात आला नाही. सराफांनाही त्यामागील बिंग फोडता आलेले नाही. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जप्त केलेल्या सोन्यामध्ये ३१ चेन, ३ अंगठ्या व कानातील १ जोडी असा बनावट माल आहे.कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी या प्रकरणाची माहिती गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली. करवीर तालुक्यातील कांही लोक बनावट सोने तारण देवून लाखो रुपये उचलत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती त्यावरून अधिक चौकशी केली असता हे प्रकरण उघडकीस आल्याचे पोलिस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.
‘लोकमत’ मध्ये वृत्तया प्रकरणाचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने बुधवार (दि.१०) च्या अंकात प्रसिध्द केले होते. त्यामध्ये आरोपी कोणत्या गावांतील आहेत व जाड मुलामा देवून फसवणूक झाल्याचे म्हटले होते. पोलिसांच्या अगोदर ‘लोकमत’ ने दिलेली माहिती तपासाअंती खरी ठरली आहे.